राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांच्या संपावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या कामगार संघटनेच्या नोटीसवरून हा संप सुरू झाला त्यांनी संपातून माघार घेतली आहे. सदावर्ते कोर्टात अनिल गुजर यांच्या संघटनेची बाजू मांडत होते. मात्र, आता त्यांनीच संप मागे घेतल्याने उद्या सदावर्ते कुणाच्या बाजूने कोर्टात उभे राहतात हे मला पाहायचं आहे, असं खोचक मत अनिल परब यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल परब म्हणाले, “मी गुणरत्न सदावर्तेंशीही बोललो. त्यांनी विलिनीकरणाशिवाय दुसरं कशावरही बोलायचं नाही असं सांगितलं. विलिनीकरणाचा मुद्दा तर सध्या समितीसमोर आहे. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलून उपयोग झाला नाही. सदावर्ते वकील आहेत त्यांनी या संपाबाबत त्यांची भूमिका कोर्टात मांडली पाहिजे. ते जर कामगार नेते असतील तर त्यांनी तसं सांगायला हवं. त्यांनी अजय गुजर यांच्या युनियनचं वकीलपत्र घेतलं होतं. त्यांनी संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे उद्या ते कोर्टात कुणाचे वकील म्हणून उभे राहतात हे मला पाहायचं आहे.”

“ज्या संघटनेने संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेनेच संप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. त्यात उद्या कोर्टात सुनावणी आहे. त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना उद्यापर्यंतची वेळ दिली आहे. त्यामुळे उद्या कामगार कामावर येतील असं वाटतं,” असं अनिल परब यांनी नमूद केलं.

“आम्ही अजून कुणाशी बोलायचं हाच प्रश्न आहे”

अनिल परब यांनी संपात नेतृत्व राहिलं नसल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, “आम्ही १ लाख कर्मचाऱ्यांशी तर बोलू शकत नाही. मी या कर्मचाऱ्यांच्या २९ युनियन्सशी बोललो आहे. यानंतर युनियन्सला बाजूला ठेवत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी कामगारांचं नेतृत्व केले. आम्ही त्यांच्याशीही बोललो. अजय कुमार गुजर ज्यांनी संपाची नोटीस दिली आणि त्या नोटीसवर हा संप सुरू होता आम्ही त्यांच्याशी बोललो. अजून कुणाशी बोलायचं हाच प्रश्न आहे.”

“…म्हणून सदावर्ते कोर्टात संपाला संप न म्हणत दुखवटा म्हणतात”

अनिल परब म्हणाले, “तुम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहात. असं असतानाही तुम्ही काम बंद करून जनतेला नाडलं आहे. आज तुमच्यामुळे जनता अडकली आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शाळेत जायला बसेस नाहीत, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना गावातून तालुक्याला जिल्ह्याला येणं आहे हे सर्व अडकून बसले आहेत. अशाप्रकारे अडवून ठेवलं असेल तर याला संप म्हणायचा नाही, तर काय म्हणायचं?”

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का? अनिल परब यांनी राज्य सरकारची भूमिका केली स्पष्ट; म्हणाले “सध्या…”!

“सदावर्ते वकील आहेत. त्यांना माहिती आहे की कोर्टात आम्ही कंटेम्प्ट पिटीशन दाखल केलंय. त्यामुळे त्यांनी हा संप मान्य केला तर त्यांच्यावर कोर्टाची कारवाई होईल अशी त्यांना भीती आहे. म्हणून ते संपात नसून दुखवट्यात आहे असं म्हणत आहेत,” असं अनिल परब यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab say now want to see from where gunratna sadavarte will appear in court pbs