मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये वैविध्यपूर्ण असे नवे बदल करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्यानात वाचनालय सुरू करण्यात येत असून आता उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशु पक्षी बनवण्याचे काम हाती घेतले आहे. बोरिवली येथील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात लाकडी घुबड, कोंबडा, ससा, अस्वल, मांजर आणि वेगवेगळे कार्टून्स तयार केले आहेत. लहान मुलांनी मोबाइलमधून बाहेर पडून निसर्गात रमण्यासाठी हा उपक्रम सुरू आहे.
हेही वाचा- बेलापूर-मांडवा वॉटर टॅक्सी सेवा उद्यापासून सुरु; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
सार्वजनिक उद्याने, मैदाने येथे अबालवृद्धांचा वावर वाढावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून २४ विभागांत वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. आतापर्यंत १५ विभागांत २२ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. आता वाचनालयासह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ पशुपक्षी तयार करण्यात आले आहेत. आर मध्य विभागाने उद्यानात ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन पावसाळ्यात उन्मळून पडलेल्या मुंबईतील वृक्षांच्या ओंडक्यांपासून लहान मुलांचे आकर्षण असणारे कार्टून्स बनविले आहेत.
हेही वाचा- ‘मुंबई सुशोभिकरण प्रकल्प’:आणखी एका विभागाची निविदा वादात
अबालवृद्धांना मोबाइलच्या विश्वातून बाहेर काढण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी उद्यान विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. लोकसहभागातून वृक्ष संजीवनी अभियान, बालदिनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण, अबालवृध्दांसाठी नर्सरी प्रशिक्षण, उद्यानात मोफत वाचनालय असे अनेक उपक्रम उद्यान विभागामार्फत राबवले जात, अशी माहिती उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिली.