मुंबई : राज्य सरकारने पशुसंवर्धकविषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबरोबरच खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्याविरोधात मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे मुंबईतील गोरेगाव येथील महाविद्यलयाच्या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे ठप्प झाला आहे, तर परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल या रुग्णालयातील आरोग्य सेवेवर काही अंशी परिणाम झाला आहे.
राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणारा पशुसंवर्धकविषयक पदविका अभ्यासक्रमासंदर्भात व्हेटरनरी काऊंन्सिल ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी होईपर्यंत हा अभ्यासक्रम रद्द करण्यात यावा, या अभ्यासक्रमाचे नावे पशुसंवर्धकविषयक पदविका अभ्यासक्रम हे बदलून नर्सिंग इन ॲनिमल हेल्थ असे करावे, तसेच प्रस्तावित असलेल्या तीन शासकीय महाविद्यालयांचे काम तातडीने मार्गी लावावे या मागण्यांसाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या गोरेगाव येथील रुग्णालयावर झाला आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयात प्राणी घेऊन येणाऱ्यांना खासगी रुग्णालय किंवा परळ रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
हेही वाचा >>>मुंबई:अकरावीची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर; २८ हजार ६७७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले
गोरेगाव येथील रुग्णालयात दररोज साधारणपणे ६० ते ७० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. या सर्वांना आता खासगी किंवा परळ येथील रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत आहे. मात्र गोरेगावमधील रुग्णालयातील प्राध्यपक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे.महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या परळ येथील दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल या रुग्णालयातील रुग्ण सेवेवरही संपाचा काही अंशी परिणाम झाला आहे. परळ येथील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा मनुष्यबळाअभावी विस्कळीत झाली आहे. परळ येथे दररोज ८० ते १०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. तर सध्या ३५० प्राणी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र या संपामुळे विविध तपासण्या, प्रयोगशाळा, वैद्यकीय विभाग आणि रुग्ण सेवेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांच्या संपामुळे प्राण्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी येत असल्याचे परळ रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत ‘इतका’ पाणीसाठा ; पाणीकपात रद्द होण्याची शक्यता
गोरेगाव रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग पूर्णपणे बंद असून, अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहेत. तर परळ येथील रुग्णालयामधील आरोग्यविषयक सेवा सुरळीत सुरू आहेत. प्राणी व त्यांच्या मालकांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.- डॉ. सरिता केळकर, अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय