लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरात जुलैमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. साथीच्या आजारांनी मुंबईकर त्रस्त झाले असताना पाळीव प्राण्यांनाही त्याची लागण होऊ लागली आहे. मुंबईत जुलैमध्ये जवळपास ६० ते ७० प्राण्यांना संसर्गजन्य आजारांची लागण झाली आहे. प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचे प्रमाण जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजार वेगाने प्रादुर्भाव होतो. मुंबई महानगरपालिका साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजन करीत आहे. मात्र माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही साथीच्या आजारांची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. जुलै महिन्यात शहरातील पाळीव प्राण्यांमध्ये लेप्टो, गॅस्ट्रो, डिस्टेम्पर आणि पॅन ल्युकमेनिया यांसारखे आजार दिसून आले आहेत. यामध्येही गॅस्ट्रोची सर्वाधिक २२, तर डिस्टेम्परची २० ते २२ प्राण्यांना लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच १२ प्राण्यांमध्ये लेप्टोसदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. जुलैमध्ये कोसळलेल्या पावसामुळे पाळीव प्राण्यांमधील या संसर्गजन्य आजारांच्या संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आणखी वाचा- समृद्धी महामार्ग अपघात: महामार्गाच्या पूर्णत्वास विलंब होणार नाही- एमएसआरडीसी
डिस्टेम्पर हा संसर्गजन्य असून, यामध्ये प्राण्यांना शिंका येणे, त्यांच्या डोळ्यातून वारंवार पाणी वाहणे, नीट न जेवणे अशी लक्षणे दिसून येतात. पाळीव प्राण्यांमध्ये साधारणपणे मांजर आणि कुत्रा यांना लेप्टो, गॅस्ट्रो, डिस्टेम्पर या संसर्गजन्य आजाराची लागण अधिक होते. तसेच पाळीव प्राण्यांपासून या आजारांचे संक्रमण माणसामध्ये होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरामध्ये पाळीव प्राण्याला लेप्टो, गॅस्ट्रो यांसारखे आजार झाले असल्यास त्यांच्यापासून लहान मुलांना दूर ठेवावे, तसेच घरातील अन्य सदस्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे, असे ‘दी बाई साकरबाई दिनशॉ पेटीट हॉस्पिटल फॉर ॲनिमल रुग्णालया’चे व्यवस्थापक डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जुलैमध्ये १० ते १२ मांजरी पॅन ल्युकमेनिया हा आजार झाला होता, असे डॉ. मयूर डांगर यांनी सांगितले.