समाजात काही जातसमुहांमध्ये लग्नाच्या रात्री नवर्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेतली जाते. त्यात ती उत्तीर्ण झाली, तरच ते लग्न ग्राह्य धरण्यात येतं. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात ही कुप्रथा चालवली जाते. संयुक्त राष्ट्र संघातही यावर चर्चा झाली आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या विषयाविरोदात आवाज उठवला. अंनिसच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाने ही कुप्रथा बंद करण्यासाठी परीपत्रक काढले. मागील वर्षी नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एका रिसॉर्टमध्ये परदेशात शिकलेल्या डॉक्टर वर व वधूची कौमार्य परीक्षा अंनिसने थांबवली. आता याच जातपंचायतीच्या कौमार्य परीक्षेवर हिंदी सिनेमा येत आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक चिन्मय पुरोहित आणि त्यांच्या टीमची भेट घेतली.
‘एक कोरी प्रेम कथा’ या हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण इंग्लंड व भारताच्या विविध भागात झाले. आता या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तो ४० लाख लोकांनी बघितला असल्याने या सिनेमाची चर्चा होत आहे. एक नववधू कौमार्य परीक्षेच्या विरोधात जाऊन कशी लढाई लढते, हे या चित्रपटात दाखवले आहे.
या पार्श्वभूमीवर जातपंचायतीच्या कौमार्य परीक्षेविरोधात लढणारे अंनिस कार्यकर्त्यांनी नुकतीच मुंबई येथील युनिफी स्टुडिओला भेट देऊन कौमार्य परीक्षेबद्दल दिग्दर्शकांशी चर्चा केल्याची माहिती जातपंचायत मुठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली.
हेही वाचा : “सरकार अपयशी ठरल्याने नागरिक बाबुजी देवस्थानातील बुवाबाजीच्या आहारी”, अकोला अपघातावर अंनिसची भूमिका
या सिनेमात मुख्य नायिका खनक बुद्धीराजा, तर नायक अक्षय ओबेराय आहेत. सहनायक राजबब्बर तर सहनायिका पुनम धिल्लो आहे. सुगंध फिल्मच्या या सिनेमाचे दिग्दर्शक चिन्मय पुरोहित आहेत. या सिनेमाचा प्रिमियर शो नाशिक येथे होणार असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली. कार्यकर्त्यांच्या या भेटीत कृष्णा चांदगुडे, ॲड रंजना गवांदे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, ॲड समीर शिंदे, कोमल वर्दे, कृष्णा इंद्रीकर, अरुणा इंद्रीकर, विवेक तमाईचेकर, ऐश्वर्या तमाईचेकर, प्रथमेश वर्दे, अमर जाधव आदी उपस्थित होते.