मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याचे राष्ट्रीय काँग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांच्याशी हितसंबंध असल्याचा आरोप होत आहे. मुंडे हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्यावरील या आरोपांच्या चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
आपल्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करताना देशमुख हत्या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची आणि तपासाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करण्याचे आदेश तपास यंत्रणेला देण्याची मागणीही दमानिया यांनी केली आहे. देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील अराजकता आणि दहशतीची स्थिती उघडकीस आली. या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणखी ढासळली असून तेथील नागरिक दहशतीखाली जगत आहेत.एक जागरुक नागरिक म्हणून ही स्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आपली जबाबदारी आहे, असे दमानियांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा :३१९ कोटी रुपयांत ५८ एकर भूखंड अदानींकडे, धारावीकर मुलुंडवासीयांचे शेजारी
मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीची मागणी
धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे नेते असून त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप झाल्याने आधीच अस्थिर असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळेही या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. लोकप्रतिनिधीने जनहितार्थ काम करणे अपेक्षित आहे. म्हणूनच धनंजय मुंडे यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगानेही चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यापासून दूर ठेवणे गरजेचे असल्याचे दमानिया यांनी पत्रात म्हटले आहे.
दमानिया यांच्या मागण्या
देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी निष्पक्ष होण्याच्या दृष्टीने खटला मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यात यावा. वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांना मुंबईतील कारागृहात ठेवण्यात यावे. तसेच, त्यांना दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) न्यायालयात हजर करावे. देशमुख हत्येच्या तपासावर न्यायालयाने देखरेख ठेवावी, अशा अन्य मागण्या दमानिया यांनी केल्या आहेत.