केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील अधीश बंगल्यावर अखेर पाडकाम सुरू करण्यात आलं आहे. बंगल्यातील बेकायदा बांधकाम खुद्द राणे कुटुंबाकडूनच पाडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नारायण राणे आणि कुटुंबीय चर्चेत आले आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये अंजली दमानिया यांनी ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाला उद्देशून सवाल केला आहे. तसेच, सत्तेच्या बळावर दादागिरी सुरू होती, असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

नारायण राणेंनी त्यांच्या जुहूमधील ‘अधीश’ या बंगल्यात काही अंतर्गत बदल केले. या बांधकामासाठी त्यांनी सीआरझेड आणि पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ही तक्रार पालिकेकडे दाखल झाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणी केली असता हे अनधिकृत बांधकाम झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पालिकेनं जाब विचारल्यानंतर नारायण राणेंनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने राणेंची याचिका फेटाळली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राणेंनी बांधकाम नियमित करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने राणेंची याचिका फेटाळली. तसेच, बांधकाम अनधिकृत करण्याबाबतचा राणेंचा अर्जही रद्द ठरवत राणेंना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. या पार्श्वभूमीवर हा राणेंसाठी मोठा धक्का मानला जात असताना त्यावरून अंजली दमानिया यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा

“हा कष्टाचा पैसा आहे का?”

“अधीश बंगल्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. कोर्टानं ‘नाक कापलं’! कुणाचंही घर तोडताना बघवत नाही. पण स्वत:च्या हातानेच हे सगळं त्यांना करावं लागतंय. पैशाच्या व सत्तेच्या बळावर वाट्टेल ती दादागिरी चालू होती. हा बंगला बघून ED ला काहीच वाटत नाही का? हा अफाट पैसा दिसत नाही का? हा कष्टाचा पैसा आहे का?” असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या ट्वीटसोबत अंजली दमानिया यांनी नारायण राणेंच्या बंगल्याचा फोटोही ट्वीट केला आहे. या ट्वीटमधून नारायण राणेंवरही ईडीनं कारवाई करावी, असंच दमानिया यांनी सूचित केलं असून त्यावर आता नारायण राणे आणि राणे कुटुंबियांकडून कोणती भूमिका घेतली जाते, हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.