महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीमपार्क विकसित करण्याच्या सत्ताधारी शिवसेनेच्या मागणीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी पाठिंबा दर्शविला.
रेसकोर्स हे धनाड्य़ांसाठी असून, त्याचा गरीब जनतेला काय फायदा? असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. त्यामुळे रेसकोर्सच्या जागी थीमपार्क व्हायला हवे, असे मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना अण्णा हजारे म्हणाले.
मुंबईतील एनसीपीए मध्ये आयोजित ‘वन पुरस्कार’ सोहळ्याला अण्णा हजारे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखिल उपस्थित होते. धनाड्यांनी देश लुटायला काढला आहे. मोकळ्या जागांवर उद्याने उभी केल्यास पर्यावरणाचा समतोल राखायला मदत होईल. राज्यातील मोठे भूखंड आणि पडीक जमिनी सरकारने ताब्यात घ्यायला हव्यात. त्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचेही अण्णा हजारे यांनी यावेळी नमूद केले.
जनलोकपालच्या बाबतीत सरकारने माझ्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अण्णांनी सरकारवर केला. आपल्या मागण्यांसाठी २ ऑक्टोबरपासून पुन्हा दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचेही अण्णा हजारे म्हणाले.   
थीमपार्कबाबत शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, गटनेत्यांच्या बैठकीतही तसा निर्णय झालेला असताना महापालिका आयुक्तांनी मात्र त्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. उलट अनेक मोठय़ा शहरांमध्ये रेसकोर्स असल्याचे सांगत त्यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या भूमिकेशी फारकतच घेतली.  मुंबईत मोकळय़ा जागा असल्याच पाहिजेत, अशी आग्रही भूमिका सत्ताधारी पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. मुंख्यमत्र्यांनीही याबाबत योग्य ती चौकशी करून निर्णय घेऊ असा सावध पवित्रा घेतला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा