मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धर्तीवर मुंबईत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे पाच मजली भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, अद्याप हे स्मारक उभे राहू शकलेले नाही. आता हे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने प्राधिकरणाने पहिले पाऊल उचलले आहे.

सुमारे ३०५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारक प्रकल्पासाठी वास्तुरचनाकार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मंगळवारी झोपु प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध केली. आता नियुक्त वास्तुरचनाकार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या माध्यमातून प्रकल्पाचे नियोजन, सविस्तर आराखडा तयार करणे आणि अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा : संजय दीना पाटील यांची खासदारकी अबाधित, आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपु प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपु योजना राबविण्यात येतात. काही वर्षांपूर्वी प्राधिकरणाने सामाजिक दायित्व म्हणून मुंबईत अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान घाटकोपरमधील चिरागनगर झोपडपट्टीत अण्णा भाऊ साठे वास्तव्यास होते. चिरागनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना अण्णाभाऊ साठे यांच्या घराचे जतन करून तेथे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची संकल्पना २०१९ मध्ये पुढे आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झोपु प्राधिकरणाने प्रारूप आराखडा तयार केला होता. २०२१ मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लावण्याच्यादृष्टीने प्रयत्नही सुरू करण्यात आले होते. मात्र हे स्मारक उभे राहू शकले नाही. आता मात्र हे स्मारक उभारण्याच्या दृष्टीने झोपु प्राधिकरणाने पहिले पाऊल उचलले आहे. भूखंड १ वर स्मारकाची मुख्य इमारत बांधण्यात येणार आहे. तर भूखंड २ वर अण्णाभाऊंचे राहते घरे आहे. या घराचे जतन करून या परिसराचाही विकास करण्यात येणार आहे.

हेही वाचा : मुंबई : डोंगरीमधील इमारतीला भीषण आग

स्मारकाचे स्वरुप…

प्राचीन लोककला, शाहीर कला यांची ओळख होण्यासाठी अण्णाभाऊ साठे कक्ष, शाहीर अमर शेख कक्ष , शोषित लढ्यासाठी साक्ष देणारे कक्ष, साहित्य कक्ष, साहित्य कक्ष, दृकश्राव्य कक्ष, कला आणि साहित्य कक्ष ५०० आसनी सभागृह, २०० – २५० आसनी २ सिनेमा गृह, तालीम रूम, रेकॉर्डींग कक्ष, सभागृह, प्रशासकीय कार्यालय, उपहारगृह, पुस्तक विक्री आणि भेटवस्तुंची दुकान, प्रदर्शन कक्ष आदी सुविधा या स्मारकातील असतील. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर खासगी कंपनीकडून स्मारकाचे तसेच प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचे व्यवस्थापन खासगी कंपनीच्या माध्यमातून केले जाण्याची शक्यता आहे.