मुंबईः धारावीत बॉम्ब असल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे. धारावी पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला गुरूवारी प्राप्त झाला होता. त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा यांना देण्यात आली. त्यांनी सर्व परिसरात तपासणी केली. त्यावेळी माहितीमध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. अखेर आरोपीविरोधात शनिवारी धारावी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ३५३(१), ३५३(३) गुन्हा दाखल केला. शांतता भंग करण्यासाठी खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना शंभरहून अधिक खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे दूरध्वनी आले आहेत. त्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करुन देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करुन दिले नाही तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची दिली धमकी दिली होती. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच दक्षिण मुंबईतील एका महिलेने ३८ वेळा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास दिला होता. याशिवाय मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका महिलेने ११० वेळा मुंबई पोलिसांना दूरध्वनी करून खोटी माहिती दिली होती. अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणांवर विनाकारण ताण येतो.
हेही वाचा – सैफच्या हल्लेखोराला पकडायला किती पोलीस कामाला?
याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणामध्ये खोटी माहिती प्रसारीत करणे अथवा धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होता. त्यामुळे आरोपींना अशा प्रकरणांमध्ये लवकर जामीन मिळतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये कठोर कायदे करण्याची आवश्यकता असून त्याबाबत अभ्यास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.