अवैध व्यवसाय करणारे शंभराहून अधिक?
शैलजा तिवले, मुंबई</strong>
परळच्या कॉलेज ऑफ फिजिशिअन अॅण्ड सर्जन (सीपीएस) महाविद्यालयातून पदव्युत्तर पदविकेची खोटी प्रमाणपत्रे सादर करणाऱ्या ५८ बनावट डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार ताजा असतानाच २०१४-१५ मध्ये अशाच प्रकारे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (एमएमसी) नोंदणी केलेले ५० डॉक्टर संशयित आढळले आहेत.
या ५० डॉक्टरांना एमएमसीने नोटीस पाठवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. राज्यात अवैध वैद्यकीय सेवा देणाऱ्या बनावट डॉक्टरांची संख्या १००हून अधिक असू शकते. डॉक्टरांना एमएमसीकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. पदवी घेतल्यानंतर नोंदणी केलेल्या डॉक्टरांना पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नव्याने नोंदणी करावी लागते. एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण झाल्याची खोटी प्रमाणपत्रे मिळवून सर्रास वैद्यकीय सेवा देत असल्याचे २०१६मध्ये उघडकीस आले. २०१६ मध्ये नोंदणी केलेल्या २० डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाले. त्या वेळी या २० डॉक्टरांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी डॉ. स्नेहल ज्ञाति यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. शिवाय, या २० डॉक्टरांची नोंदणी एमएमसीने रद्द केली.
या गैरप्रकाराची पाळेमुळे खणून काढताना २०१५च्या आधी नोंदणी केलेल्या डॉक्टरांच्या कागदपत्रांची छाननी एमएमसीने सुरू केली. २०१५मध्ये ५८ डॉक्टरांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोंदणी केल्याचे आढळले.
या ५८ डॉक्टरांची नोंदणी एमएमसीने रद्द केली असून याच महिन्यात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुन्हा एकदा डॉ. स्नेहल ज्ञाति आणि त्यांनी उल्लेख केलेल्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. अशाच प्रकारे २०१४ मध्ये खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोंदणी केलेले ५० संशयित डॉक्टर आढळले आहेत. त्यामुळे हा गैरव्यवहार मोठा असल्याचा अंदाज आहे. त्याच्या सूत्रधाराला शोधणे आवश्यक आहे. या डॉक्टरांना नोटीस पाठवून त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले असल्याचे एमएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आग्रीपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. खोटी प्रमाणपत्रे कशी ओळखावीत, याची माहिती सीपीएस महाविद्यालयांकडून मागविली आहे. भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तपासाचा आढावा घेण्यात येणार आहे, असे आग्रीपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘त्या’ वीस जणांवरही लवकरच गुन्हा
प्रथम २०१६ मध्ये दोषी आढळलेल्या २० डॉक्टरांनीच फसवणुकीचा आरोप करीत गुन्हा दाखल केला असला तरी ते डॉक्टर मोकाट सुटले आहेत. खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी तेही दोषी असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, असे आम्ही एमएमसीला सांगितले आहे. त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. मात्र वारंवार मागणी करूनही या २० डॉक्टरांची माहिती एमएमसीने दिलेली नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.