लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : डी एन नगर, अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कंत्राटदार जे. कुमार या कंपनीला ४६ लाखांचा दंड ठोठावला आहे. मेट्रो २ ब प्रकल्पातील कामाच्या दिरंगाईप्रकरणी जे कुमारला दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला आहे. तर इतरही प्रकल्पात दिरंगाई तसेच हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कंपनीला आतापर्यंत पाच कोटी रूपयांहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे.

एमएमआरडीएकडून २३.६४३ किमी लांबीच्या मेट्रो २ ब चे काम सध्या सुरू आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्पात पूर्ण करून मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार, एमएमआरडीएने मंडाले ते चेंबूर या पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. हा पहिला टप्पा डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून एप्रिल-मे २०२६ मध्ये तो वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे, पहिल्या टप्प्यातील कामाचा नियमित आढावा एमएमआरडीएकडून घेतला जात आहे. तर कंत्राटदारास प्रत्येक कामासाठी काही ठराविक मुदत देण्यात आली आहे. असे असताना जे कुमार कंपनीने मेट्रो २ ब मार्गिकेतील पियर आणि पियर कॅप्सच्या उभारणीचे काम वेळेत पूर्ण केले नसल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत एमएमआरडीएकडून कामातील दिरंगाईप्रकरणी जे कुमारला ४६ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीकडून कामात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. अनेकदा या तक्रारीत तथ्य आढळून आले असून आतापर्यंत एमएमआरडीएसह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) जे. कुमारला पाच कोटी रुपयांहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आणखी वाचा-Zeeshan Siddique-Salman Khan threatened : झिशान सिद्दीकी व अभिनेता सलमान खानला धमकी

एमएमआरसीकडूनही दंडात्मक कारवाई

एमएमआरडीएकडून जे. कुमारविरोधात अनेकदा दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असतानाच एमएमआरसीनेही नुकतीच या कंपनीविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामास विलंब केल्यासह मार्गिकेची चाचणी सुरू असतानाच मार्गिकेत पाणी शिरल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वीच एमएमआरसीने जे. कुमार कंपनीला दोन कोटी रुपयांचा दंड आकारला होता. एकूणच आतापर्यंत विविध प्रकल्पाच्या कामात दिरंगाई आणि हलगर्जीपणा केल्याबाबत या कंपनीला पाच कोटी रुपयांहून अधिकचा दंड ठोठावण्यात आला आहे. इतक्या मोठ्या दंडात्मक कारवाईनंतरही या कंपनीकडून काम संथगतीने करणे, कामास विलंब करणे असे प्रकार सुरूच आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another delay in the work of metro 2 b by the contractor mumbai print news mrj