मुंबईतील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले आहे. मुलुंड येथे पाच जणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार कचरा वेचणाऱ्या एका महिलेने केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी शनिवारी उशीरापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले होते.
पीडित महिला ४० वर्षांची असून ती नंदूरबार जिल्ह्यातील आहे. मुंबईत कचरा वेचण्याचे काम करून ती आपला उदरनिर्वाह करते. शुक्रवारी रात्री ती अमर नगर येथील टेम्पोत झोपली होती. त्यावेळी तिच्या परिचयाच्या इमसाने तिला जबरदस्ती परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलात नेले. तेथे त्याने आपल्या चार साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके स्थापन केली आहेत. शनिवारी संध्याकाळी खंडीपाडा येथून तीन संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पीडित महिलेने त्यापैकी एका आरोपीला ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणातील टेम्पोचालक पीडित महिलेच्या परिचयाचा असल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त खलिद कैसर यांनी सांगितले. याप्रकरणात आम्ही अधिक तांत्रिक पुरावे गोळा करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सांताक्रुझ मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सांताक्रुझ येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी दुपारी या मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरात एकटीच होती. जेव्हा आई परत आली तेव्हा तिने मुलीला जखमी अवस्थेत पाहिले. तिला डॉक्टरांकडे नेल्यावर तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी याप्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतले होते. चौकशीअंती शेजारी राहणाऱ्या संजय मोहिते (३६) या इसमाने बलात्कार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा