कुलाबा-वांद्रे-सिपझ मेट्रो ३ मार्गिकेसाठी आणखी एक मेट्रो गाडी महिन्याभरात मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित सहा गाड्या लवकरच टप्प्याटप्प्याने आणल्या जाणार आहेत.
मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) च्या माध्यमातून केली जात आहे. ३३.५ किमीच्या या मार्गिकेतील १०० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले असून आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरु आहे. हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरसीने कामाला वेग दिला आहे.
हेही वाचा- मुंबई: महिनाभरात तीन बस आगीच्या भक्ष्यस्थानी; ‘बेस्ट’च्या ४०० ‘सीएनजी’ बस बंद
दुसरीकडे रोलिंग स्टॉकचे कामही वेगात सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून शक्य तितक्या लवकर गाड्या मुंबईत आणून त्यांची चाचणी करण्याच्यादृष्टीने कामाला सुरुवात केली आहे. यापूर्वी आंध्र प्रदेशातील श्री सिटीमधून दोन मेट्रो गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. या गाड्यांची सारीपूत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये चाचण्या सुरु आहेत. तर महिन्याभरात आता तिसरी गाडी येईल अशी माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यासाठी ९ गाड्यांची गरज आहे. त्यानुसार दोन गाड्या आल्या असून आता तिसरी गाडी मार्चमध्ये येईल. तर उर्वरित सहा गाड्या येत्या काही महिन्यात टप्प्या टप्प्यात आणण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.