लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल. तलावाच्या पाच कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा ना पर्याय पुढे आला आहे. त्याची आयआयटी, रुरकीच्या प्राध्यापकांमार्फत चाचपणी करण्यात येईल. दुरुस्तीत कप्पे अंतर्गत जोडले जातील. त्यामुळे यासाठीच्या खर्चाचाही आढावा घेतला जाईल.

१३६ वर्षे जुन्या जलाशयाच्या दुरुस्तीचा प्रश्न गेले काही महिने प्रलंबित आहे. जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ३८९ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी, पर्यावरणवाद्यांनी झाडे हटवण्यास विरोध केला होता. तसेच या कामामुळे ‘हँगिंग गार्डन’ काही वर्षे बंद ठेवावे लागणार होते. त्यामुळे नागरिकांनीही विरोध केला होता.

आणखी वाचा-ग्रॅन्ट रोड येथे इमारतीचे छत कोसळले, मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची शक्यता

परिणामी, जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते. याबाबत निर्णय घेण्यासाठी पालिकेने ‘मुंबई आयआयटी’च्या तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती नेमली होती. मात्र, आठ सदस्यांच्या समितीने परस्परविरोधी असे दोन अहवाल दिले. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आयआयटी, रुरकीच्या प्राध्यापकांची मदत घेतली. पाच कप्प्यांपैकी दोन कप्प्यांना किरकोळ दुरुस्तीची गरज असल्याचे आढळले. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत ठेवून दुरुस्तीबाबत कार्यपद्धती सुचवणे अपेक्षित आहे.

या कामासाठी किती खर्च येणार याचाही आढावा घेण्यात येईल. नवीन अतिरिक्त जलाशय बांधण्याचा खर्च आणि कप्पे अंतर्गत जोडण्याचा खर्च यांची तुलना करून अंतिम निर्णय घेतला जाईल. -अभिजीत बांगर, अतिरिक्त पालिका आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another option for repairing the malabar hill reservoir mumbai print news mrj