लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मलबार हिल येथील १३६ वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलशायाची पुनर्बांधणी करण्याऐवजी डागडुजी करावी अशी सूचना पालकमंत्री आणि मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.
संपूर्ण दक्षिण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मलबार हिल येथील जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी ३८९ झाडे कापावी किंवा पुनर्रोपित करावी लागणार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी झाडे हटवण्यास विरोध केला आहे. तसेच जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेचे हँगिंग गार्डन पुढील ५ ते ७ वर्षांसाठी बंद ठेवावे लागणार आहे. परिणामी, पुनर्बांधणीच्या कामावरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी नागरिकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले होते. त्यानुसार रहिवासी आणि पर्यावरणवादी यांची एक समिती आधीच स्थापन करण्यात आली आहे.
आणखी वाचा-अकरावी प्रवेश : सातवी विशेष व अंतिम प्रवेश फेरी बुधवारपासून सुरू
लोढा यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीबाबत पत्र पाठवले आहे. नागरिकांच्या विनंतीनुसार पर्यावरण पूरक विकासाला प्राधान्य द्यावे, असे लोढा यांनी पत्रात नमुद केले आहे. ताजमहाल दुरुस्त होऊ शकतो, तर जलाशय का नाही, असा सवाल उपस्थित करून लोढा यांनी २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात मलबार हिल येथील जलाशयाची दुरुस्ती शक्य असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे.
जलाशयासाठी दुसरी जागा शोधावी अथवा जलशाय तोडण्याऐवजी त्याची डागडुजी करावी अशी सूचना त्यांनी केली आहे. जलाशयाच्या पर्यावरणपूरक विकासासाठी महानगरपालिका एका महिन्यात अहवाल सादर करणार असली तरी आम्ही सुचवलेल्या उपाययोजनांचा विचार करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आणखी वाचा-गुजराती पाट्या तोडफोड प्रकरणी घाटकोपरमध्ये आंदोलन
कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा पर्याय?
दक्षिण मुंबईची पाण्याची गरज भागवण्यासाठी फक्त एका जलाशयावर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे नवीन जलाशय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता पर्यायी जागा म्हणून हँगिंग गार्डनच्या शेजारी पालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या जागेचा विचार करावा अथवा सागरी किनारा मार्ग येथील जागेचा वापर करावा. महानगपरलिकेने या पर्यायी जागांचे भौगोलिक सर्वेक्षण व तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून शक्यतांची पडताळणी करावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.