मुंबई : ‘मेट्रो ३’साठी (कुलाबा-वांद्रे-कुलाबा) आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता आरेमधील कारशेडसाठी एकाही झाडाची कत्तल करावी लागणार नाही असा दावाही त्यांनी केला आहे. मात्र हा दावा साफ खोटा असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. आरेमधील कारशेडसाठी २,७०० झाडे कापण्यात येणार असल्याचे ‘मेट्रो ३’च्या मूळ प्रस्तावात नमूद आहे. आतापर्यंत २७०० पैकी अंदाजे २०० ते २५०  झाडेच कापण्यात आली आहेत. त्यामुळे आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी दोन हजारांहून अधिक झाडे कापावी लागणार असून यामुळे पर्यावरणप्रेमींचा येथे कारशेड उभारण्यास विरोध आहे.

कांजुरमार्ग येथील कारशेड पुन्हा आरेमध्ये हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणप्रेमींनी कडाडून विरोध केला आहे. तर कारशेड आरेमध्येच उभारण्यावर सरकार ठाम आहे. कारशेडच्या आड येत असलेली आरे परिसरातील झाडे कापून झाली आहेत. आता कारशेडसाठी एकही झाड कापण्याची गरज नाही. त्यामुळे पर्यावरणप्रेमींचा विरोध हा मुद्दाच राहत नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी उपमुख्यमंत्र्यांचा हा दावा साफ खोटा असल्याचे सांगत त्यांच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) मूळ प्रस्तावात आरेतील २७०० झाडे कापण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. २०१९ मध्ये रात्रीच्या वेळी आरेतील झाडे कापण्यात आली. त्या वेळी आंदोलकांनी आरे वसाहतीत धाव घेऊन वृक्षतोड थांबवली. या वेळी एमएमआरसीने २०० ते २५० झाडांची कत्तर केली होती. त्यातही या दोन ते अडीच वर्षांत कापण्यात आलेल्या झाडांच्या ठिकाणी नव्याने झाडे आली आहेत. त्यामुळे आरेत एकही झाड कापावे लागणार नाही असा दावा करून उपमुख्यमंत्री  दिशाभूल करीत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. 

मुंबईकर पुरस्कृत आंदोलन 

आरे आंदोलन पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोपही उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. यालाही जोशी यांनी उत्तर दिले आहे. सर्वसामान्य आरेप्रेमी मुंबईकर आणि आरेतील भूमिपुत्र आदिवासी पुरस्कृत हे आंदोलन आहे. आरेतील वनसंपदा आणि वन्यप्राणी पुरस्कृत आंदोलन असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.

कांजुरची जागा विकासकाच्या घशात?

कांजुरची जागा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळेच कांजुरऐवजी आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री आग्रही असल्याचा आरोप वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.  कांजुर येथे कारशेड बांधण्यासाठी केवळ ३६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातही एकाच ठिकाणी ‘मेट्रो ३’सह अन्य तीन मेट्रो मार्गिकांतील कारशेडही बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे ही जागा संपादित करण्यासाठी खर्च होणारे २,२२८ कोटी रुपये वाचतील अशी माहिती जोशी यांनी दिली. त्यामुळे उपमुख्यमंत्री खोटे दावे करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Story img Loader