मध्य रेल्वेवरील ठाणे – दिवा पाचवी – सहावी मार्गिका पूर्ण होण्यास बरीच वर्षे लागल्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेन्ट्रल – बोरिवली दरम्यानच्या पाचव्या- सहाव्या मार्गिकेसाठीही प्रतीक्षा करावी लागणार आहे. वांद्रे – खार दरम्यान पाचव्या मार्गिकेसाठी जुनी उन्नत मार्गिकेचे पाडकाम, तसेच मुंबई सेन्ट्रल – वांद्रे स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेची अन्य कामे शिल्लक आहेत. त्यामुळे संपूर्ण पाचवी – सहावी मार्गिका सेवेत दाखल होण्यास आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना पूर्णपणे स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर लोकल प्रवास आणखी सुकर होईल, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>मुंबई:प्रेयसीसोबत फिरणाऱ्या तरुणाची भरस्त्यात हत्या
मुंबई सेन्ट्रल – बोरिवलीदरम्यान पाचवी, सहावी मार्गिका उभारून मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालय व पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामुळे या पटट्यातून जाताना अप, डाऊन जलद लोकल गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहू शकेल. यासाठी २००८-०९ साली मुंबई सेन्ट्रल – बोरिवली पाचव्या – सहाव्या मार्गिकेला मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेसाठी ९१८ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सेन्ट्रल – बोरिवली या पट्ट्यातील सांताक्रुझ – बोरिवलीदरम्यानच्या पाचव्या मार्गिकेची, तसेच मुंबई सेन्ट्रल – वांद्रे टर्मिनसदरम्यानची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र वांद्रे टर्मिनस – सांताक्रुझदरम्यानची पाचवी मार्गिका उभारण्यात तांत्रिक अडथळे येत आहेत. या पट्ट्यात पाचव्या – सहाव्या मार्गिकेसाठी जागा उपलब्ध करण्याकरीता वांद्रे – खारदरम्यानची जुनी रेल्वे उन्नत मार्गिका पाडून त्याच्या बाजूलाच नवीन रेल्वे पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून यासाठी ८७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. सहाव्या मार्गिकेत जून २०२३ पर्यंत खार – गोरेगावदरम्यानचा पट्टा आणि त्यानंतर गोरेगाव – बोरिवलीदरम्यानची सहावी मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत आकाराला येईल. त्यामुळे दोन्ही मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.