मुंबईत लेप्टोस्पायरोसिस पाठोपाठ आलेल्या स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून स्वाइन फ्लूमुळे मुंबईत आणखी एका महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील स्वाइन फ्लूच्या मृतांची संख्या २७ वर पोहोचली आहे.
जूनमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईत लेप्टोस्पायरोसिसच्या साथीने डोके वर काढले होते. या साथीत मुंबईत १६ जणांचा बळी गेला. तर सुमारे ७० जणांना त्याची लागण झाल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाने केली. त्यानंतर या साथीवर नियंत्रण मिळविण्यात पालिका यशस्वी झाली. लेप्टोस्पायरोसिस आटोक्यात येत नाही तोपर्यंत मुंबईत स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रादुर्भाव झाला. स्वाइन फ्लू झाल्यामुळे सांताक्रूझ येथील एका ४५ वर्षीय महिलेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. शुक्रवारी दिवसभरात स्वाइन फ्लूची बाधा झालेले ११ रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. जुलैमध्ये १२५ जणांना स्वाइन फ्लू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल १९५९ जणांना स्वाइन फ्लू झाला आहे.
डॉक्टरांना सूचना
स्वाइन फ्लूच्या चाचण्या महागडय़ा आणि वेळखाऊ आहेत. चाचण्यांचे अहवाल मिळण्यास वेळ लागत असल्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आल्यास रुग्णाला आवश्यक ती औषधे देण्यास सुरुवात करावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टरांना केल्या आहेत.