वेळेवर वेतन मिळत नसल्याने आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा होत नसल्याच्या निषेधार्थ बेस्टमधील वडाळा आगारामधील भाडेतत्त्वावरील बसगाड्या चालविणाऱ्या कंत्राटी चालकांनी रविवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे वडाळा आगारात सोमवारी ६३ बसगाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

वेळेवर वेतन मिळावे आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा व्हावी –

बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्या उपलब्ध केल्या असून त्या विविध मार्गांवर चालविण्यात येत आहेत. भाडेतत्त्वावरील बसगाडीवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालकाची नियुक्त करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चालकांना वेळेवर वेतन मिळालेले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. वडाळा आगारात एम. पी. ग्रुपतर्फे भाडेतत्वावर बसचा पुरवठा करण्यात आला असून या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी चालक त्या चालवित आहेत. वेळेवर वेतन मिळावे आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यात जमा व्हावी या मागणीसाठी कंत्राटी चालकांनी गेल्या काही महिन्यांपासून वारंवार ‘काम बंद’ आंदोलन केले आहे. चालकांनी रविवारीही याच प्रश्नावरून आंदोलन केले. त्यामुळे ४८ बसगाड्या आगारातून बाहेर पडू शकल्या नाहीत.

६३ गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकल्या नाहीत –

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने स्वमालकीच्या २९ बसगाड्या सोडल्या होत्या. चालकांनी सोमवारीही आंदोलन सुरूच ठेवले. परिणामी, सुमारे ६३ गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकल्या नाहीत. वडाळा रेल्वे स्थानक येथून सुटणाऱ्या हिदुस्थान कंपनी, गांधीनगर, गोदरेज कॉलनी, कन्नमवार नगरसह वडाळातील काही मार्गांवर प्रवाशांना बस वेळेत उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. परिणामी, प्रवाशांना बराच वेळ बसची प्रतीक्षा करावी लागली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने २७ बसगाड्या सोडल्या. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी सूचना बेस्ट उपक्रमाने कंत्राटदाराला केली आहे.

मे महिन्यातही कंत्राटी चालकांनी केले होते आंदोलन –

मे महिन्यात वडाळ्यासह एकूण पाच आगारातील कंत्राटी चालकांनी वेतन व अन्य प्रश्नांवरून आंदोलन केले होते. त्यावेळी बेस्ट उपक्रमाने कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा एकदा कंत्राटी चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Story img Loader