जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी केला. 
पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर मंगळवारी सकाळी दाभोलकर यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जादूटोणाविरोधी वटहुकूम काढण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी हा आरोप केला.
दाभोलकरांवर कोणत्याही राजकीय पक्षांनी हल्ला केला नसल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, हा वैचारिक मतभेदाचा विषय आहे. ज्यांनी हा हल्ला घडवून आणला ते नक्कीच राजकीय पक्ष नाहीत. जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मांडले जाऊ नये आणि ते मंजूर होऊ नये, असे ज्यांना वाटत होते, त्यांनीच दाभोलकरांचा आवाज कायमचा बंद केला. अशा प्रकारचे हल्ले करणाऱया संघटनांना समाजाने वाळीत टाकले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, दाभोलकरांवरील हल्ला पूर्वनियोजित होता. मात्र, या हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेवर काळा डाग पडला आहे. आता केवळ हल्लेखोरांना पकडून त्यांना शिक्षा देण्याचे काम आपण करू शकतो. जादूटोणाविरोधी विधेयकाविरोधात लोकांच्या मनात विष पेरणाऱयांमुळेच दाभोलकरासारख्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली.

Story img Loader