सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला असून, शासकीय आणि पोलीस अधिकारी लाच घेताना पकडले जाण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील काही अधिकाऱ्यांनी हप्ते घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे उद्योग सुरू केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विधानसभेत केला.  कायदा आणि सुव्यवस्था यावरील चर्चेला सुरुवात करताना खडसे यांनी गृह खात्याचे  वाभाडे काढले. अलीकडेच रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या सचिवाला लाच घेताना पकडण्यात आले. त्याच्याकडे ५० लाखांची रोख आढळली. एवढे पैसे आले कोठून आले अशी विचारणा केली.
तेव्हा आयपीएस कोठे होते?
आमदारांकडून एका उपनिरीक्षकाला मारहाण झाल्यावर सारे वरिष्ठ पोलीस अधिकारी एकत्र आले. जणू  संकट आले आहे, अशा पद्धतीने वातावरणनिर्मिती करण्यात आली. पण ११ ऑगस्टला आझाद मैदानात रझा अकादमीच्या मोच्र्याच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला किंवा त्यांना मारहाण झाली. तेव्हा पोलीस महासंचालक दयाळ यांच्यासह सारे आय.पी.एस. अधिकारी कोठे गेले होते, असा सवालही खडसे यांनी केला. तेव्हा या अधिकाऱ्यांना एकत्र येऊन निषेध केल्याचे ऐकिवात नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. मराठी किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणे किंवा त्यांनी भारतीय पोलीस सेवेत बढती मिळणार नाही याचेच कटकारस्थान महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात बसणारे अमराठी अधिकारी करतात, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग किंवा सहआयुक्त हिमांशू रॉय यांच्या बदल्या किंवा बढत्या का रखडल्या, अशी विचारणाही त्यांनी केली.
महिलांवरील अत्याचारात वाढ
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. चारच दिवसांपूर्वी मुंबईत उपनगरीय रेल्वे गाडीत  युवतीवर अतिप्रसंगाचा प्रकार झाला. नगर जिल्ह्यात दलित महिलेची हत्या करण्यात आली. मुंबईत महिन्याला सरासरी २३ बलात्काराचे गुन्हे दाखल होतात. गेल्या वर्षभरात राज्यात ९९२ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.
कारागृह अधीक्षकांवर टीका
कारागृहांमध्ये कैद्यांवर गोळीबार होणे किंवा एखाद्या कैद्याचा खून होणे हे प्रकार घडत असल्याबद्दल खडसे यांनी चिंता व्यक्त करून भ्रष्ट तुरुंग अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सारे होत असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. ऑर्थर रोड कारागृहात एखाद्या आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ाची रवानगी झाल्यास दोन ते तीन लाख रुपये घेऊन त्याची स्वतंत्र व चांगली व्यवस्था केली जाते.
मृत कर्मचाऱ्यांना बढती
पोलीस दलाच्या कारभाराचे वाभाडे काढले. कारभार कसा चालतो याची दोन उदाहरणे त्यांनी दिली. अनंत गावडे हे मरण पावले असताना त्यांच्या बढलीचा आदेश काढण्यात आला. तर आझाद मैदानातील िहसाचारात मरण पावलेले संतोष हांडे या शिपायाच्या बढतीचा आदेश निघाला होता. हे काय चालले असा सवालही खडसेंनी केली.  

Story img Loader