सिंगल फेजिंग आणि स्वतंत्र गावठाण फीडरच्या कामांअभावी भारनियमन वाढत असल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी रुद्रावतार धारण केला खरा; पण आता मात्र त्याचे बिंग फुटले आहे. टोपे यांचा जालना आणि क्षीरसागर यांचा बीड जिल्हा वीजचोरीचे उच्चांक गाठण्यात आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. परिणामी ‘लाल दिव्या’खालीच अंधार अशी परिस्थिती असून आपल्या जिल्ह्यातील परिस्थिती सुधारण्यात, लोकांची मानसिकता बदलण्यात साफ अपयशी ठरल्याने त्यावर पांघरुण घालण्यासाठीच त्यांनी ऊर्जा विभागावर हेत्वारोप केल्याची चर्चा आहे.
सध्या ८४ टक्के राज्य भारनियमनमुक्त आहे. केवळ भरमसाट वीजचोरी आणि पैसे थकवणाऱ्या भागातच ते सुरू आहे. वीजचोरीचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पैसे भरण्याची सवय लोकांना लावण्यासाठी ऊर्जामंत्री अजित पवार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नाराजी पत्करूनही ठाम भूमिका घेत आहेत. मात्र, अहमदनगर, जळगावसारख्या सात जिल्ह्य़ांत वीजचोरी कमी झालेली नाही. राजकीय वरदहस्तामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. राज्यात सर्वाधिक वीजचोरी आणि थकबाकी असलेल्या १०० फीडरची यादी ऊर्जा विभागाने तयार केली आहे. तेथे वीजचोरीचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यात जालना जिल्ह्य़ातील २८ तर बीड जिल्ह्य़ातील १९ फीडरचा समावेश आहे. म्हणजेच वीजचोरीत अग्रेसर असलेल्या राज्यातील १०० फीडरपैकी जवळपास ५० टक्के फीडर हे राजेश टोपे यांच्या जालना व क्षीरसागर यांच्या बीड जिल्ह्यातील आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा