मुंबई: गेल्या कित्येक महिन्यांपासून थंडावलेली प्लास्टिक विरोधी मोहीम मुंबई महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा तीव्र केली असून सोमवारपासून पुन्हा एकदा पालिकेच्या पथकाने दुकाने व आस्थापनांना भेटी देऊन कारवाई केली. एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला एमपीसीबी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कदम यांनी प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई पुन्हा सुरू करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मुंबईत महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यास सुरुवात झाली. यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार असल्याची माहिती उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी दिली. त्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. पथकाच्या समन्वयातून प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल वस्तुंवर प्रभावीपणे कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई : महापालिकेचे ५८६ कर्मचारी निवडणूक कामातच, ४६ जणांचे वेतन रोखले
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक) अधिसूचना, २०१८ प्रकाशित केली आहे. त्यानुसार एकल वापराच्या म्हणजेच सिंगल युझ प्लास्टिक वस्तू उत्पादन, वापर, वाहतूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री आणि साठवणूक यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच केंद्र शासनाने सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ ही १२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अधिसूचना २०१८ आणि केंद्रीय शासनाची सिंगल यूज प्लास्टिक अधिसूचना २०२१ अंतर्गत विविध वस्तूंचे उत्पादन, उपयोग, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवण प्रतिबंधित आहेत.
मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) करु नये. कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्त चंदा जाधव यांनी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने केले आहे.
महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबईत प्रतिबंधात्मक प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू केली आहे. १ ते १९ जानेवारी या कालावधीत ५ हजार ७८३ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११८ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे १६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. तर २० जानेवारी २०२५ रोजी एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला असल्याची माहिती जाधव यांनी दिली.