अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसातील अजून एका पोलीस अधिकाऱ्याला NIA नं अटक केली आहे. एआयएकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून याआधी सचिन वाझे, रियाझ काझी यांच्यावर कारवाई झालेली असताना या प्रकरणात आता अजून एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक सुनिल माने यांना एनआयएनं अटक केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. त्यामुळे अँटिलिया स्फोटक प्रकरणामध्ये अडकलेल्या मुंबई पोलिसातील अधिकाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सचिन वाझेला १३ मार्च रोजी तर रियाझ काझीला ११ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.

 

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दहशतवादी कट असल्याचं तेव्हा सांगण्यात येत होतं. त्यानंतर ५ मार्चला ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन याचा संशायस्पद मृत्यू झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि तपासाअंती अनेक खुलासे होत गेले. हा संपूर्ण कट सचिन वाझे याने रचल्याचं उघड झाल्याने त्याला अटक करण्यात आली. आता या कटात आणखी कोण कोण सामील आहे, याचा एनआयए कसून तपास करत आहे.

अँटिलिया स्फोटकं प्रकरण: सचिन वाझेचा साथीदार पोलीस अधिकारी रियाझ काझीला अटक

दरम्यान, अँटिलिया स्फोटकं प्रकरणासोबतच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सुनील माने यांचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे. अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर काही दिवसांतच स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीमध्ये सापडला होता. सुरुवातीला आत्महत्येचं चित्र असलेला हा मृत्यू नंतर हत्या असल्याचं एनआयएच्या तपासामध्ये स्पष्ट झालं आहे.

याआधी सचिन वाझेसोबतच रियाझ काझी नावाच्या अधिकाऱ्याला देखील एनआयएनं अटक केली आहे. काझीनं विक्रोळीमधील एका नंबर प्लेटच्या दुकानातील सीसीटीव्ही फूटेज नष्ट करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यात सचिन वाझेला मदत केल्याचा प्रमुख आरोप काझीवर आहे. याच दुकानातून अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारसाठी बनावट क्रमांक बनवून घेण्यात आला होता.

Story img Loader