मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज माजी पोलीस अधिकारी सुनील माने यांनी मंगळवारी मागे घेतला.
कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चात्ताप झाला म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी अर्जात म्हटले होते. २६ वर्षांच्या कारकिर्दीत चांगलीच कामगिरी केली. केंद्र तसेच राज्य सरकारचे २८० पुरस्कारही मिळाले. दुर्दैवाने आणि नकळत आपल्याकडून काही चुका झाल्या आणि त्या चुकांचा पश्चात्ताप करण्यासाठी, पीडितांना न्याय देण्यासाठी या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचा दावा माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणाऱ्या अर्जात केला होता. न्यायालयानेही या अर्जाची दखल घेऊन त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले होते.
त्यानुसार, एनआयएने उत्तर दाखल करून या प्रकरणात माने यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याच्या अर्जाला आपला विरोध असून तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती.
वाझे यांना समज देण्याची मागणी
या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात तळोजा कारागृह प्रशासनाने मंगळवारी विशेष न्यायालयाकडे तक्रार केली. काही दिवसांपूर्वी वाझे यांनी चक्कर येत असल्याची आणि उलटय़ा होत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. परंतु, वाझे यांनी त्याला नकार दिला. यापूर्वी, वाझे यांनी कारागृहात योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे वाझे यांच्याकडून यापुढेही अशाच प्रकारची तक्रार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे, असे कारागृह प्रशासनाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच वाझे यांना समज देण्याची मागणी करण्यात आली.