पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी टीका केली. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्याची गरजच काय होती, असा प्रश्न उपस्थित केला.
ते म्हणाले, पाकिस्तानशी आपले असलेले संबंध सर्वांना माहिती आहेत. मग अशावेळी कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईत आयोजित करण्याचे कारणच काय होते. ते काही आपले दोस्त नाहीत. पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी कुरापती सुरू असतात. उद्या जर सुधींद्र कुलकर्णी यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्यांच्या पत्नीची, मुलीची, मुलाची छेड काढली, त्यांना मारले, त्यांच्यावर कचरा फेकला, तरी सुद्धा सुधींद्र कुलकर्णी त्या शेजाऱ्यांना आपल्या घरी चहा पिण्यासाठी बोलावणार का, असा प्रश्न अनुपम खेर यांनी उपस्थित केला.
कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावरून दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. त्याचबरोबर या कार्यक्रमाला तीव्र विरोध केला होता. राज्य सरकारने कडेकोट सुरक्षा पुरविल्याने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता.

Story img Loader