मुंबई: देवनारच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकणारा विद्यार्थी अनुराग जैस्वाल (२९) याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याच्या खोलीत आढळला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर सोमवारी त्याचा मृतदेह पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनुरागच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मूळचा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे राहणारा अनुराग टाटा इन्स्टिट्यूट येथे मानव संसाधन या विषयाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. सोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शनिवारी रात्री नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टी होती. या पार्टीत अनुरागने मद्य सेवन केले होते. त्यामुळे त्याची शुद्ध हरपली होती. त्याच्या मित्रांनी त्याला तो राहत असलेल्या चेंबूर येथील घरी आणले. त्यानंतर रविवारी सकाळी मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठत नसल्याने त्याला तत्काळ परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हेही वाचा – ‘जीएसबी’च्या गणेशोत्सवासाठी ४००.५८ कोटींचे विमा संरक्षण
हेही वाचा – संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत
मद्याचे अती सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात सोमवारी अनुरागच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अनुरागच्या पार्थिवावर लखनऊ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनुरागवर कुठेही रॅगिंगसारखा प्रकार घडला नसल्याचे चेंबूर पोलिसांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
© The Indian Express (P) Ltd