विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली ७२ तासांचं सरकार स्थापन केलं होतं. पण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच हे सरकार स्थापन केल्याचा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
“शरद पवारांशी बोलून जर तो शपथविधी झाला असता, तर नक्कीच ते सरकार चाललं असतं. ७२ तासांचं सरकार कोसळलं नसते. देवेंद्र फडणवीसांविषयी काय बोलायचं? अलिकडे त्यांची वक्तव्य पाहतोय. देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावे आश्चर्य आहेत. आधीची आठ आश्चर्य जगात आहेत. दोन आश्चर्य दिल्लीत बसलेले आहेत. हे दहावं आश्चर्य महाराष्ट्रात आहे,” असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.
हेही वाचा : शिवसेना सत्तासंघर्ष : बुधवारी सर्वोच्च न्यायालयात नियमितपणे सुनावणी; आज काय घडलं? जाणून घ्या
संजय राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊतांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा त्यांनी केलेल्या घोटाळ्यावर चर्चा केली, तर अधिक बरं होईल,” अशी टीका अनुराग ठाकूर यांनी संजय राऊतांवर केली आहे.
हेही वाचा : फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर ‘पहाटेच्या शपथविधी’वर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले “शरद पवारांनी…”
“कल्याण-डोंबिवली मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा एकत्रितरित्या अधिक लक्ष देऊन लढू. तसेच, पहिल्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येऊ,” अशी आशा अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. ते कल्याणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.