Anushakti Nagar Assembly constituency 2024 Mahayuti vs MVA Tukaram Kate Nawab Malik : अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठी रंगतदार लढाई पाहायला मिळू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेना (संयुक्त) व राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये चढाओढ पाहायला मिळाली आहे. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांचा या मतदारसंघावर वरचष्मा राहिला आहे. मात्र, शिवसेनेच्या तुकाराम काते यांनी आजवर मलिकांसमोर नेहमीच कडवं आव्हान निर्माण केलं आहे. २०१४ च्या निवडणुकीत तर काते यांनी मलिकांचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत मलिकांनी हा मतदारसंघ कातेंकडून हिसकावून घेतला होता. दरम्यान, यंदा या मतदारसंघातून पुन्हा एकदा मलिक विरुद्ध काते अशी लढाई पाहायला मिळू शकते. मात्र, या दोन नेत्यांना त्यांचे पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का? त्याआधी, जागावाटपात ही जागा मविआमध्ये शिवसेनेला (ठाकरे) आणि महायुतीत राष्ट्रवादीला (अजित पवार) सुटणार का? हा पहिला प्रश्न आहे.
महाविकास आघाडीत ही जागा मिळावी यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आग्रही आहे. त्यामुळे ही जागा कोणच्या वाट्याला येणार हे येत्या दोन-तीन आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र ही जागा ठाकरे गटाला सुटल्यास उद्धव ठाकरे पुन्हा एकदा तुकाराम काते यांना येथून उमेदवारी देऊ शकतात. शिवसेना फुटल्यानंतर तुकाराम काते यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणं पसंत केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे काते यांना निष्ठेचं फळ म्हणून पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. तसेच राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे पक्ष फुटल्यानंतर अधिकृतपणे कोणत्याही गटात गेलेले नाहीत. त्यांची अजित पवार गटाशी जवळीक असली तरी त्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच ते शरद पवार गटाच्या एकाही बैठकीला, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीत. पक्षाच्या कार्यालयातही गेले नाहीत. त्यामुळे नवाब मलिकांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी मिळणार का? आणि मिळाल्यास ते कोणत्या पक्षाकडून येथून निवडणुकीला उभे राहणार? हे दोन मोठे प्रश्न सर्वांसमोर उभे आहेत.
हे ही वाचा >> काँग्रेस मालाड पश्चिमचा गड राखणार की महायुती मुसंडी मारणार?
महायुतीत सावळागोंधळ
मतदारसंघाच्या पुनर्रचनेपासून नवाब मलिक यांनी अणुशक्तीनगर मतदारसंघावर पकड निर्माण केली. २००९ व २०१९ मध्ये ते या मतदारसंघातून निवडून आले. २०१४ मध्ये फारच कमी मतांनी पराभूत झाले होते. मराठी, दलित, मुस्लीम, उत्तर भारतीय अशी संमिश्र वस्ती असलेला अणुशक्तीनगर मतदारसंघ मलिक यांनी चांगल्या पद्धतीने बांधला होता. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला कुर्ल्यातील जागा हडप करण्यात मदत केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंत्रिपदी असताना मलिक यांना अटक केली होती. त्याआधी अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मोहीम उघडल्यामुळेही मलिक हे भाजप नेत्यांना खुपत होते. त्यामुळे भाजपाचा नवाब मलिकांना विरोध आहे. अजित पवार गटाने त्यांना पक्षात घेऊ नये, आणि तरीही पक्षात घेतलं तर त्यांना उमेदवारी देऊ नये असा दबाव भाजपाने अजित पवार गटावर निर्माण केल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा >> घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीची वाट खडतर, लोकसभेनंतर चिंता वाढली!
अजित पवार यांच्या पक्षाची पंचाईत
महायुतीत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजप पाठिंबा देणार नाही हे स्पष्टच आहे. मलिक यांच्याऐवजी त्यांनी बहिणीला किंवा अन्य नातेवाईकांना उभे करावे, असा पक्षात पर्याय आहे. पण नवाब मलिक हे आमदारकी सोडण्यास तयार होतील का? जामिनाची मुदत वाढवून मिळवण्यासाठी मलिक यांना भाजपाला दुखावून चालणार नाही. मलिक यांनी अपक्ष निवडणूक लढवली तरीही महायुतीत शिवसेना शिंदे गट वा भाजपकडून उमेदवार उभा केला जाऊ शकतो. या साऱ्या गोंधळात अजित पवार यांच्या पक्षाची पंचाईत झाली आहे.
हे ही वाचा >> जोगेश्वरी पूर्व मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच, मविआतही संघर्ष! यंदा नवा आमदार मिळणार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
नवाब मलिक (राष्ट्रवादी) – ६५,२१७ मतं
तुकाराम काते (शिवसेना) – ५२,४६६ मतं
हे ही वाचा >> Andheri East Assembly Constituency : ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात महायुतीची ताकद पणाला, भाजपा-शिंदेंना आव्हान पेलणार का?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
तुकाराम काते (शिवसेना) – ३९,९६६ मतं
नवाब मलिक (राष्ट्रवादी) – ३८,९५९ मतं
हे ही वाचा >> Mankhurd Shivaji Nagar Assembly Constituency : सपाच्या अबू आझमींसमोर महायुतीचा निभाव लागणार का?
२००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
नवाब मलिक (राष्ट्रवादी) – ३८,९२८ मतं
तुकाराम काते (शिवसेना) – ३२,१०३ मतं
ताजी अपडेट
अणुशक्तीनगर मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण ४६ इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ अर्ज बाद करण्यात आले आहे, तर. २० अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. राष्ट्रवादीने (अजित पवार) येथून नवाब मलिक यांना, तर शिवसेनेने (शिंदे) येथून अविनाश राणे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीने येथून दोन उमेदवार दिले असून त्यांच्यातील अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला, महाविकास आघाडीने बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना येथून उमेदवारी दिली आहे. ते राष्ट्रवादीच्या (शरद पवार) तिकीटावर निवडणूक लढणार आहेत. यासह मनसेने नवीन आचार्य व वंचितने सतीश राजगुरू यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे.