पालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे माजी नगरसेवकांच्या हस्ते किंवा राजकारण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊ नये. परस्पर कोणी असे उद्घाटन केल्यास त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार करावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पालिकेची मुदत संपल्यानंतर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र तरीही अनेक विकासकामांची उद्घाटने करण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उत्सुक असतात. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. त्यातच सध्याच्या राजकीय परिस्थितीत, शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर दोन्ही गटांत श्रेयाची लढाई सुरू आहे. त्यातच गेल्या महिन्यात पालिकेने दहिसर येथील जलतरण तलावाचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले होते. कोणत्याही उद्घाटनाशिवाय हा जलतरण तलाव सुरू केला होता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या जलतरण तलावाचे उद्घाटन केले होते. या प्रकरणावरून शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. तसेच घोसाळकर पती पत्नींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> मुंबई : वातानुकूलित लोकल, प्रथम श्रेणीच्या डब्यातील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई; ८६ लाख रुपयांची दंडवसुली
या प्रकारानंतर पालिका आयुक्तांनी आता सर्व विभाग प्रमुख आणि सहाय्यक आयुक्तांना याबाबत कडक शब्दात मोबाईलवर निरोप धाडले आहेत. पालिकेच्या विकासकामांचे कोणत्याही राजकारण्यांकडून, समाजसेवकांकडून अनधिकृतपणे उद्घाटन करण्यात आल्यास त्याबाबत ताबडतोब पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. अशा कोणत्याही प्रकरणात कसलीही वाट न बघता तक्रार करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे अनेक उद्घाटने रखडली होती. मात्र नंतर प्रशासनाने काही विकासकामे उद्घाटनाशिवाय खुली करण्यास सुरूवात केली. भायखळा येथील शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह देखील असेच सुरू करण्यात आले होते. त्यामुळे आयुक्तांचा हा निर्णय म्हणजे विकासकामांचे श्रेय ठाकरे गटालाही मिळू नये यासाठी खेळलेली ही राजकीय चाल असावी अशी संशय व्यक्त केला जात आहे.