एअर इंडियाच्या विमानाने जानेवारी ते मार्च या काळात अवघ्या १७९९ रुपयांमध्ये देशातील कोणत्याही मार्गावर एकेरी प्रवास करण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मात्र त्यासाठी आरक्षण करण्यासाठी बुधवारचा एकच दिवस शिल्लक आहे.
जानेवारी ते मार्च हा काळ हवाई प्रवासासाठी कमी गर्दीचा हंगाम असतो. त्या काळामध्ये प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी एअर इंडियाने नामी युक्ती शोधून काढली असून त्यात १७९९ ते ४१९९ रुपयांत देशात प्रवास करता येणार आहे. यासाठी आरक्षण करण्याची मुदत १९, २० आणि २१ नोव्हेंबर या तीन दिवसांसाठी होती. एअर इंडियाने प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी त्यांच्या नरिमन पॉइंट येथील इमारतीबाहेर मोठा फलक लावला असून त्यावर ‘१६ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यानच्या काळात विमान प्रवास करा अवघ्या १७९९ रुपयांमध्ये’ अशी जाहिरात केली आहे. दोन दिवसांत आरक्षण करण्याचेही आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७९९ ते ४१९९ रुपयांमध्ये प्रवाशांना कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही ठिकाणी एकेरी मार्गावर प्रवास करता येणार आहे. ३२५ शहरांसाठी ही योजना असून काही प्रवास मार्गाचे भाडे पुढीलप्रमाणे आहे. चेन्नई-दिल्ली : ३६९९ रुपये; दिल्ली-कोलकाता : ३६९९ रुपये; चेन्नई-मुंबई : २६९९ रुपये; दिल्ली-मुंबई : ३६९९ रुपये; चेन्नई-कोलकाता : २६९९ रुपये; कोची-त्रिवेंद्रम : १७९९ रुपये; चेन्नई-पुणे : १७९९ रुपये; इम्फाळ-गुवाहाटी : १७९९ रुपये; कोलकाता-भुवनेश्वर : १७९९ रुपये आणि मुंबई-अहमदाबाद : १७९९ रुपये. या सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना http://www.airindia.in या एअर इंडियाच्या संकेतस्थळावर किंवा १८०० १८०१४०७ या टोल फ्री क्रमांकावरही आरक्षण करता येणार आहे.