मुंबई : मुंबई, ठाणे वगळता राज्य सरकारकडून राज्यभरात सुरू करण्यात येत असलेले ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार आहे. राज्यातील कोणत्याही आपला दवाखानामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवर डॉक्टरांना कळणार आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. आपला दवाखाना डिजिटल करण्याचे काम व्यावसायिक सामजिक दायित्व (सीएसआर) निधीमधून करण्यात येणार आहे.
राज्यातील विविध शहरातील झोपडपट्ट्यां, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक व गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात ७०० आपला दवाखाना सुरू करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या ३६६ दवाखान्यांच्या माध्यमातून २७ लाख ६६ हजार ७३७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यातील ३ लाख ३९ हजार ४२५ रुग्णांची मोफत प्रयोगशाळा तपासणी तर ४७ हजार ५६४ गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली आहे. मंजूर आपला दवाखान्यापैकी ३३४ दवाखाने कार्यान्वित करण्याची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू आहे. रुग्णांना होणारा लाभ लक्षात घेता राज्य सरकारने सर्व आपला दवाखान डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रोटिन ईगर्व्ह टेक्नोलॉजी लिमिटेड या कंपनीकडून मिळणाऱ्या व्यावसायिक सामाजिक दायित्त्व निधीमधून प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल आरोग्य परिवर्तन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
आपला दवाखाना डिजिटल झाल्याने दवाखान्यातील औषधांचा साठा, कर्मचाऱ्यांची संख्या, रुग्णांवर करण्यात येणारे उपचार हे एका क्लिकवर सहज कळणार आहेत. आपला दवाखान्याद्वारे संकलित करण्यात येणारी रुग्णांची माहिती ही पूर्णत: गोपनीय ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एखादा नागरिक त्याच्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यास तेथील आपला दवाखान्याची माहिती रुग्णाला सहज व्हावी यासाठी आपला दवाखान्याचे जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी चिकित्सा व्यवस्थापन प्रणाली, डॉक्टरांना प्रशिक्षण, मोबाईल ॲप, दवाखान्याची माहिती संकलित करण्यासाठी स्वतंत्र डॅशबाेर्ड प्राेटीन कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आपला दवाखाना डिजिटल करण्यासाठी प्रोटिन ईगर्व्ह टेक्नोलॉजी लिमिटेड कंपनीसोबत झालेल्या करारानुसार पुढील दोन वर्षे ही सेवा मोफत दिली जाणार आहे. त्यानंतरच्या खर्चासाठी प्राेटीन कंपनीद्वारे स्वतंत्र निधीची व्यवस्था करण्यात आली आहे.