मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू होऊन वर्ष झाले असून या वर्षभरामध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून तब्बल २३ लाख नागरिकांनी लाभ घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये ‘आपला दवाखाना’ची संख्याही वाढविण्यात येणार असल्याने या वर्षअखेरपर्यंत लाभार्थ्यांचीही संख्या ३० लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध १९४ ठिकाणी ‘आपला दवाखाने’ कार्यरत आहेत. यातील २८ ठिकाणी पॉलीक्लिनिक, तर १६६ ठिकाणी दवाखाने आहेत. यानुसार १९४ ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार उपलब्ध असून आतापर्यंत तब्बल २३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी या दवाखान्यांचा लाभ घेतला आहे. आपला दवाखानामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवाही पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
हेही वाचा >>> मोघरपाडा कारशेडची १७४.०१ हेक्टर जागा राज्य सरकारकडून एमएमआरडीएला हस्तांतरिेत; शासन निर्णय जारी
कार्यरत दवाखान्यांत आतापर्यंत २३ लाखांहून अधिक नागरिकांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला आहे. यापैकी पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे ६० हजारांहून अधिक रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोग तज्ज्ञ , नेत्र तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
लवकरच दवाखान्यांची संख्या २०० पार
सध्या ‘आपला दवाखान्यां’ची संख्या ही १९४ पर्यंत पोहचली असून मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत ऑक्टोबर महिन्यात आणखी ७ हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची भर पडणार आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत १३ पैकी ६ दवाखाने सुरू झाले असून आणखी ७ दवाखान्यांची भर महिना अखेरीपर्यंत पडणार आहे. या नव्या संख्येमुळे आपला दवाखाना २०० चा आकडा पार करणार आहे.