राज्य सरकारने व्यापाऱ्यांचे कमिशन १०वरून ६ टक्के करण्याचा निर्णय घेतल्याने अस्वस्थ झालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळांच्या घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांनी येत्या शुक्रवारपासून तीन दिवस ‘बाजार बंद’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मात्र या मुद्दय़ावरून सरकारच्या विरोधात ‘आरपारची लढाई’ करावी का, या विषयी व्यापाऱ्यांमध्येच दोन तट आहेत. कांदा-बटाटा तसेच भाजीपाला बाजारातील बहुतांश व्यापारी या ‘बंद’मध्ये सहभागी होण्याची मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारशी दोन हात करण्याचे बेत आखणाऱ्या व्यापारी संघटनांमध्येच फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यभरातील वेगवेगळ्या बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या भाजीपाला, फळे तसेच कांदा- बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांना मालाच्या विक्रीवर ठराविक दराने कमिशन मिळते. मुंबईच्या भाजीपाला बाजारात आठ टक्के, फळ बाजारात १० तर कांदा-बटाटा बाजारात साडेसहा टक्के असे कमिशनचे दर निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडून येणाऱ्या मालाच्या विक्रीवर या ठराविक दराने कमिशन कापून घ्यायचे आणि उर्वरीत पैसे शेतकऱ्याला द्यायचे ही एकंदर व्यापाराची पद्धत आहे. पणन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी कमिशन टक्केवारीचे सर्वत्र समानीकरणाचे धोरण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला असून सर्व बाजारांमध्ये यापुढे सहा टक्के कमिशन घेण्यात यावे, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. या निर्णयामुळे पुणे, नाशिकसह राज्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी यापूर्वीच बंदची हाक दिली आहे. पुण्यात बेमुदत बंद आंदोलन सुरू झाले असून या बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या दबावामुळे मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांवरही आंदोलनाचा दबाव वाढू लागला आहे. यापूर्वीच ‘थेट पणन’च्या माध्यमातून एपीएमसीतील घाऊक बाजारांची मक्तेदारी मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे.
या साऱ्या पाश्र्वभूमीवर सरकारला थेट अंगावर घेण्याऐवजी चर्चेतून तोडगा काढावा, असे बहुतांश घाऊक व्यापाऱ्यांचे मत आहे. तरीही तीन दिवस बाजारपेठा बंद करून सरकारला इशारा द्यायचा निर्णय सोमवारी व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मात्र, ‘बाजार बंद’चा निर्णय योग्य नसून कमिशनच्या मुद्दयावर सरकारशी चर्चा करायला हवी, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईचे उपमहापौर आणि भाजीपाला बाजाराचे माजी संचालक अशोक गावडे यांनी दिली. तर कांदा-बटाटा बाजारातील व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाहीत, अशी माहिती कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाचे पदाधिकारी चंद्रकांत रामाणे यांनी दिली. तर हा प्रश्न एकटय़ा मुंबईतील व्यापाऱ्यांचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना भेडसावणारा आहे. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी दिली.

Story img Loader