मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. शैक्षणिक जीवनातील शालेय शिक्षणाचा महत्वाचा टप्पा पूर्ण करून विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे वेध लागले आहेत. विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इयत्ता अकरावीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. अकरावी प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम नोंदवितात, याआधारे त्यांचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होतो. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सदर टप्पा अत्यंत महत्वाचा मानला जातो. नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदाही चुरस रंगणार आहे. शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून देण्यात आला असून, आतापर्यंत १ लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरण्यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक आज जाहीर केले जाणार आहे. सध्या पहिल्या फेरीचे नियोजन सुरु असून, त्यानंतर पुढील दोन फेऱ्यांचे नियोजन घोषित केले जाईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत.

दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण

कला आणि क्रीडा विषयातील प्राविण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात येतात. यंदा राज्यातील १ लाख ७३ हजार ५८६ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत. लातूर विभागात सर्वाधिक १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी असले तरी इतर विभागांच्या तुलनेत अतिरिक्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. सर्वाधिक अतिरिक्त गुण मिळवणारे विद्यार्थी कोल्हापूर विभागातील आहेत. तेथे ४२ हजार ६४९ विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत. राज्यातील १ हजार ७६८ विद्यार्थ्यांना शास्त्रीय नृत्यासाठी, २ हजार ३१८ शास्त्रीय संगीतासाठी, १ हजार ३८९ विद्यार्थ्यांना वाद्यवादनासाठी, २४ हजार १६० विद्यार्थ्यांना लोककलेसाठी, १६ विद्यार्थ्यांना नाटय़कलेसाठी, १ लाख १७ हजार ७८३ विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी, २५ हजार १६१ विद्यार्थ्यांना एनसीसीसाठी तर ९४३ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडसाठी अतिरिक्त गुण मिळाले आहेत.

३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी

राज्यातील ३३ हजार ३०६ विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. हे विद्यार्थीही अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. आता अनुत्तीर्ण झालेल्या विषयात फेरपरीक्षेदरम्यान उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश निश्चित होतील. त्याचबरोबर अनुत्तीर्ण झालेले ८६ हजार ५९४ विद्यार्थी फेरपरीक्षेस पात्र आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास हे विद्यार्थीही यंदाच अकरावी प्रवेशासाठी किंवा इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरतील.

२३ तृतीयपंथी विद्यार्थी

तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांनाही त्यांची स्वतंत्र ओळख नमूद करण्याची मुभा प्रवेश अर्जात देण्यात आली होती. यंदा २३ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यातील ९ विद्यार्थी मुंबई विभागातील, ७ पुणे विभागातील, ३ नागपूर विभागातील तर २ विद्यार्थी औरंगाबाद आणि नागपूर विभागातील आहेत.

चार वर्षांतील नीचांकी निकाल

यंदाचा दहावीचा निकाल हा गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी निकाल आहे. यापूर्वी २०२० मध्ये करोनाची साथ सुरू झाली तेव्हा टाळेबंदी लागू करण्यापूर्वी दहावीच्या बहुतेक विषयांची परीक्षा झाली होती. त्यावर्षीचा निकाल ९५.३०टक्के होता. त्यानंतर २०२१ मध्ये परीक्षाच झाली नाही. सरासरीनुसार मूल्यांकन करण्यात आले. त्यावर्षीचा निकाल ९९.९५ टक्के होता. गेल्यावर्षी परीक्षा सुरळीत झाली मात्र अभ्यासक्रम कमी होता. त्यावेळी निकाल ९६.९४ टक्के लागला. विद्यार्थ्यांच्या बदललेल्या सवयी, लिखाणाचा कमी सराव याचा परिणाम निकालावर दिसत असल्याचे शिक्षकांचे मत आहे.