मुंबई : बेस्ट उपक्रमातील बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा फक्त ३३ टक्के राहिला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या किमान ३,३३७ बसगाड्यांचा ताफा असावा, यासाठी मुंबईकरांना एकत्र करून, ‘बेस्ट बचाओ’ अभियान राबवले जात आहे. आता हे अभियान जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या अभियानाला पाठिंबा द्यावा. यासह ‘बेस्ट बचाओ’ हा विषय घेऊन कलात्मक देखाव्यांच्या माध्यमातून ‘बेस्ट’ला वाचवण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे, असे ‘बेस्ट बचाओ’कडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुचवण्यात आले आहे.
पुढील महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून, त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. गणेशभक्तांमध्ये देखावा करण्याची लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात कायम प्रबोधनात्मक देखावा केले जातात. त्या अनुषंगाने यंदा मुंबईच्या बेस्ट परिवहन सेवेवर देखावा करण्याचे आवाहन ‘बेस्ट बचाओ’कडून केले आहे.
गेल्या ७५ वर्षांहून अधिक काळापासून मुंबईकरांना बेस्ट सेवा देत आहे. मात्र, २०१९ सालापासून खासगी कंत्राटदारांच्या बस बेस्टच्या नावाने चालविल्या जात आहेत. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीचा ताफा कमी होण्यास सुरुवात झाली. आताच्याघडीला बेस्टच्या ताफ्यात १,०८५ बस असून संपूर्ण ताफ्याच्या ३३ टक्केच बस शिल्लक आहेत. बेस्ट उपक्रमातील १५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बस भंगारात काढण्यात येत आहेत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने स्वमालकीच्या बस खरेदी केल्या नाहीत. तर, ३१ मार्च २०२५ पर्यंत फक्त ७६१ बसचा ताफा शिल्लक राहील. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२५ नंतर २५१ बस म्हणजे फक्त ८ टक्के बसगाड्या शिल्लक राहतील. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबईकरांना बेस्ट बसची सुविधा मिळणे कठीण होईल. त्यामुळे मुंबईकरांच्या सुमारे ३३ लाख प्रवाशांच्या सेवेसाठी ३,३३७ स्वमालकीचा ताफा वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बेस्टचा स्वमालकीचा ताफा वाढविण्यावर, बेस्टची सेवा सुधारण्यावर देखावे करावेत, असे आवाहन ‘बेस्ट बचाओ’कडून केले आहे.