मुंबई : दहीहंडी असोसिएशनने (महाराष्ट्र राज्य) आक्षेप घेतलेला असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम सुरू केली आहे. या संस्थेने गोविंदांना विमा संरक्षणासाठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा १४ ऑगस्टपासून ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
सध्या सर्वत्र दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने मानवी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे. मात्र थर रचताना गोविंदाचा मृत्यू झाल्यास अथवा गंभीर जखमी झाल्यास संबंधित गोविंदाच्या कुटुंबियांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. त्यामुळे २०२३ प्रमाणे २०२४ मध्येही दहीहंडी दरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ७५ हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याबाबतचा ‘शासन निर्णय’ही राज्याच्या क्रीडा विभागातर्फे २५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच गोविंदांपर्यंत विमा संरक्षण पोहोचवण्याची जबाबदारी ‘महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन या संस्थेकडे सोपविली आहे. मात्र ही संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली आहे. ही शासनाची आणि गोविंदा पथकांची दिशाभूल आहे. त्यामुळे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी, अशी मागणी ‘दहीहंडी असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)’ या संस्थेने अलीकडेच पत्रकार परिषदेत केली. मात्र असे असतानाही महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
विमा संरक्षणाचा कालावधी हा १४ ते २८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत असून मोफत विमा संरक्षण मिळविण्यासाठी गोविंदा पथकांनी २४ ऑगस्टपर्यंत मंडळाचे विनंती पत्र, अर्ज व सर्व गोविंदांची नावे, वय व मोबाईल क्रमांक नमूद करून स्कॅन करून gi.mrdga@gmail.com या ई – मेल आयडीवर पाठवायचे आहेत. विमा संरक्षणाच्या यादीत १४ वर्षांखालील गोविंदांचा समावेश नसेल, असे महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने सांगितले.
हेही वाचा – दिवा-सीएसएमटी लोकलसाठी प्रवाशांचे आंदोलन, कोकणातील रेल्वेगाड्यांना दिवा येथे थांबा द्या
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील इतर भागांतील गोविंदा पथकांनी मोफत विमा संरक्षणाच्या अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसंबंधित विविध शंकांसाठी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर यांच्याशी ९२२४२८५८७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
© The Indian Express (P) Ltd