गणेशोत्सवकाळात कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण यंदा अधिक असणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचविले आहेत. मात्र या पर्यायी मार्गाचा वापर केल्यास प्रवासाचे अंतर वाढणार आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत जाणाऱ्या वाहन चालकांनी कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवरून सातारा, उंब्रज, पाटण, कोयनानगर, कुंभार्ली घाट खेर्डी, चिपळूण मार्गाने गेल्यास १२७ किलोमीटर अधिकचे अंतर पार करावे लागेल, अशी माहीती महामार्ग पोलिसांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त यंदा एसटीच्या ३ हजारपेक्षा जास्त एसटी गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. रेल्वे गाड्यांचे तिकीट उपलब्ध होत नसल्याने वैयक्तिक वाहने घेऊन कोकणात जाणाऱ्यांचे, खासगी प्रवासी बसचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत कोकणात जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने आणि रस्त्यांवरील खड्डे पाहता वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही आहे. ही कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गही वापरण्याचे आवाहन केले आहे.

प्रवासाचे अंतर वाढणार
रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता कळंबोली-पळस्पे फाटा मार्ग वापरण्याऐवजी (अंतर ७.५ किमी) कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे वाहन चालकांसाठी अडीच किलोमीटर अंतर वाढणार आहे. कळंबोली-वाकण ऐवजी (६७.५ किमी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग-खोपोली-पाली-वाकणचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ८.५ किमी अंतर वाढणार आहे. याशिवाय कळंबोली-हातखंबा या २९५ किलोमीटर मार्गाऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा, कराड, वठार, त्यानंतर उजवीकडे वळण घेऊन मलकापूर, शाहूवाडी, आंबाघाट, साखरपा, हातखंबा मार्गे गेल्यास ११२ किलोमीटर अंतर वाढणार आहे.
कळंबोली-राजापूर ऐवजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून सातारा, कराड, वठार, नंतर उजवीकडे वळण घेऊन मलकापूर, शाहूवाडी, आंबा घाट, लांजा, राजापूर ३४५ किलोमीटरऐवजी ४२२ किलोमीटर अंतर लागेल, कळंबोली-कणकवली ऐवजी सातारा, कराड, कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे, गगनबावडा घाट, वैभववाडी वरून गेल्यावर ४०० किलोमीटरच्या अंतरात आणखी ५५ किलोमीटरची भर पडणार आहे. याशिवाय परशुराम घाट बंद झाल्यास खेड तालुक्यातील पीरलोटे, चीरणी, आंबडस, कळंबस्ते, चिपळूण मार्गे गेल्यावर ८.५० किलोमीटरच्या अंतरासाठी आणखी साडे सात किलोमीटर अंतर मोजावे लागेल.

अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवकाळात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, भाजीपाला, वैद्यकीय वापरासाठीचा प्राणवायू या जिवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू रहाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज, साहित्य, माल इत्यादी ने-आण करणाऱ्या वाहनांलाही बंदी नसेल.

पोलीस नियंत्रण कक्षाची मदत घेण्याचे आवाहन

गणेशोत्सवकाळात मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना वाहन चालकाला काही अडचण आल्यास ते तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाचीही मदत घेऊ शकतील. यासाठी पुढील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकता.

महामार्ग पोलीस मुख्य नियंत्रण कक्ष
९८३३४९८३३४ आणि ९५०३२१११०० व्हॉट्सॲप क्रमांक ९५०३५१११००
नवी मुंबई – (०२२) २७५७२२९८, २७५७४९२८, २७५६१०९९

रायगड- ७४४७७११११०, ८६०५४९४७७२, ०२१४१२२८४७३
रत्नागिरी- ०२३५२-२२२२२२
सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८२००, २२८६१४

Story img Loader