लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : एमबीए/एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ दिल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आता विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीलाही मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.

अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता यावा, तसेच ऐनवेळी त्यांची अर्ज नोंदणी करण्यासाठी धावपळ होऊ नये यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र एमबीए / एमएमएस आणि एमसीए, बी-एचएमसीटी / एम एचएमसीटी इंट्रीग्रेटेड, बी-डिझाईन आणि एम-एचएमसीटी या पाच अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद मिळाल्याने विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला ३ जानेवारी २०२५ पासून सुरुवात करण्यात आली होती. नोंदणीसाठी दिलेल्या महिनाभराच्या कालावधीत विधि पाच वर्ष अभ्यासक्रमाला २२ हजार २१३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी फक्त नोंदणी केली असून, शुल्क भरून अर्ज निश्चित केलेला नाही. हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत व त्यांना संधी गमवावी लागू नये, तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करता यावा, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यानंतर पुन्हा अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गतवर्षी विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी राज्यात गतवर्षी १२ हजार ७३१ जागा होत्या. या जागांकरीता घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेसाठी राज्यभरातून ३४ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये ४ हजार ५११ विद्यार्थी आणि ४ हजार ९२२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. गतवर्षी झालेल्या ९ हजार ४३८ प्रवेशामुळे विविध महाविद्यालयांमध्ये ३ हजार २९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक जागांवर प्रवेश होऊन रिक्त जागांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.

Story img Loader