मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली असून गेल्या पाच दिवसांमध्ये अर्ज विक्री-स्वीकृतीस म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. आजवर अनामत रकमेसह केवळ २,०७४ अर्ज दाखल झाले आहेत. ही संख्या खूपच कमी असून असाच प्रतिसाद राहिल्यास अर्ज संख्या ५० हजारांचा पल्ला गाठण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात झाली असून या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गट अशा चारही उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. मात्र सर्वाधिक मागणी असलेल्या अत्यल्प गटासाठी अत्यंत कमी म्हणजेच केवळ ३५९ घरे या सोडतीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या गटातील इच्छुकांमध्ये नाराजी आहे. परिणामी, सोडतीला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याच वेळी अत्यल्प गटातील घरांसह इतर उत्पन्न गटातील घरांच्या किंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातील घरांच्या किंमती दीड ते पावणेतीन कोटी रुपयांच्या घरात आहेत. महिना ५० ते ७५ हजार रुपये कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इच्छुक अर्जदारांना ही घरे कशी परवडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच महागड्या घरांमुळे कमी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मुंबई: प्राचीन लेण्यांविषयी महापालिका बेपर्वा, संवर्धनाबाबत निष्क्रियतेवर न्यायालयाची नाराजी
महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी यावेळी अत्यंत कमी दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी साधारण ४५ दिवस मुदत देणे अपेक्षित असताना मुंबई मंडळाने केवळ २६ दिवसांचा कालावधी दिला आहे. या कालावधीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे, मोठी अनामत रक्कम जमा करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक जण निर्धारित वेळेत अर्ज करू शकतील की नाही, असा प्रश्न आहे.
हेही वाचा : मुंबई : खासगी टॅक्सीत विसरलेले २५ लाखांचे दागिने पोलिसांनी मिळवून दिले
बनावट संकेतस्थळ अखेर सायबर सेलकडून बंद
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ तयार करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची बाब उघड झाल्यानंतर म्हाडाने याविरोधात वांद्रे येथील सायबर केंद्रात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सायबर केंद्राने बनावट संकेतस्थळ तातडीने बंद केले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या बनावट संकेतस्थळाद्वारे एकाच व्यक्तीची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज आणि अनामत रक्कम भरावी, असे आवाहन सातत्याने म्हाडाकडून केले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd