मुंबई : MHADA Houses Pune म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आज, मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाईन अर्जविक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया २९ सप्टेंबरपर्यंत सुरु रहाणार आहे तर १८ ऑक्टोबरला सोडत काढली जाणार आहे. मार्चमध्ये पुणे मंडळाने सुमारे ६ हजार घरांची सोडत काढली होती. त्यानंतर आणखी एक सोडत काढण्याचे जाहीर करून त्यानुसार तयारी सुरू केली होती. अनेक दिवसांपासून इच्छुकांना या सोडतीची प्रतीक्षा होती.
अखेर मंडळाने मंगळवारी ५ हजार ८६३ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मंगळवारी १२ वाजल्यापासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुण्यातील म्हाडाच्या कार्यालयात १८ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३, पीएमएवायमधील ४३१, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४, म्हाडा गृहनिर्माण प्रथम प्राधान्य योजनेतील २४४५ आणि २० टक्क्यातील २२४० घरांचा यात समावेश आहे.