मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत विविध अभ्यासक्रमासाठी ३ लाख ८१ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज हे अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी सीईटी) आहेत. त्याचबरोबर एमबीए, एमएमएस आणि बी.एड या अभ्यासक्रमांसाठी अधिक नोंदणी झाली आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया व प्रवेश प्रक्रिया सुलभरित्या व्हावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २५ डिसेंबरपासून विविध अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणीला सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी ५ लाख २२ हजार ९५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील १ लाख ४१ हजार १५४ विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी प्रक्रियेमध्ये असून ३ लाख ८१ हजार ८०१ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. अर्ज निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अर्ज एमएचटी सीईटीसाठी करण्यात आले आहेत.
एमएचटी सीईटीसाठी २ लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यात पीसीबी गटासाठी ८९ हजार ८०४ आणि पीसीएम गटासाठी १ लाख ५६ हजार ६६७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. तसेच एमएमबी/एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ४४ हजार ६३० विद्यार्थ्यांनी तर बी.एड अभ्यासक्रमासाठी ३० हजार २६ अर्ज आणि विधि तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी २२ हजार ९६३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. एम. एचएमसीटी अभ्यासक्रमासाठी सर्वात कमी ३६ अर्ज आले आहेत. तसेच बीएड, एमएडसाठी १९२ अर्ज, फाईन आर्ट अभ्यासक्रमाला २३८ अर्ज, बीए बीएस्सी बी एड अभ्यासक्रमासाठी ३०२ अर्ज आणि बी.डिझाईन अभ्यासक्रमाला ३२३ अर्ज आले असून, या अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळाला आहे.
हेही वाचा – पेण अर्बन बँकेच्या प्रशासक मंडळात ठेवीदार प्रतिनिधित्वाद्वारे राज्य सरकारचा दिलासा
हेही वाचा – न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून उद्या शपथविधी
बीसीए, बीबीए, बीएमएस अभ्यासक्रमाला कमी नोंदणी
गतवर्षी बीसीए, बीबीए, बीएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा प्रथमच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांना त्याची कल्पना नसल्याने दोन वेळा प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे ८६ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने ३८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. या अभ्यासक्रमाच्या राज्यात १ लाख ८ हजार जागा आहेत. यंदा या अभ्यासक्रमासाठी २ जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत फक्त ७ हजार ९२८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.