मुंबई : पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी असताना राज्यभरात साडेसहा लाख पदवीधर उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याशिवाय आयुर्वेदिक डॉक्टर, बी टेक, एम कॉम, एमबीए अशा उच्चशिक्षित सुमारे ६८ हजार जणांनी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर ६८ तृतीयपंथियांनीही पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे.
राज्यभरात पोलीस दलातील १८ हजार ३३१ पदांसाठी सुमारे १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत आहे. पोलीस शिपाई, चालक व राज्य राखीव पोलीस दल यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी बारावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. पण त्यानंतरही या भरतीसाठी सहा लाख ३९ हजार ३१७ पदवीधर उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यात कला व वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. याशिवाय विज्ञान शाखेतून पदवी संपादन केलेल्यांनीही अर्ज केले आहेत.
हेही वाचा >>> मुंबई : अपेक्षेपेक्षा अधिक खर्च झालेल्या गृहप्रकल्पांची महारेराकडून तपासणी
महत्त्वाची बाब म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६८ हजार २९२ विद्यार्थ्यांनीही या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यात आयुर्वेदिक डॉक्टर, अभियांत्रिकी शाखा, वकील, एमबीए शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. दरवर्षी ५५ टक्के अर्ज पदवीधर अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचे येतात. पण यावर्षी टक्केवारीचा विचार केल्यास ते प्रमाण कमी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईकरांना रक्तदाबाचा त्रास, लवकरच मुंबई महानगरपालिकेतर्फे तपासणी शिबीर
दरवर्षी राज्यात सुमारे सहा हजार पदांसाठी भरती होते. पण करोनामुळे दोन वर्षांनंतर भरती होत आहे. तसेच मिरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये वाढल्यामुळे यावर्षी १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य पोलिसांनीही संबंधित बदल संकेतस्थळावर केले असून त्यानंतर तृतीयपंथियांनाही अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ६८ तृतीयपंथियांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. मुंबईतही ७०७६ पदांसाठी भरती होत असून सुमारे सहा लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अलिबाग, नांदेड येथे दोन उमेदवारांकडून उत्तेजक औषधांचा वापर झाल्याचा प्रकार उघड झाला होता.