लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना आवश्यक दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे असेल. या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला.
मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर, दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे मिळून एकूण ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी घेतला आहे. त्यानुसार, महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व संबंधित कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कक्षाकडून गरीबांवरील उपचारासाठी कोट्यवधींचे अर्थसहाय्य
भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या नियुक्तीमुळे सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामात अत्युच्च गुणवत्ता राखली जावी, यासाठी मदत मिळणार आहे. अधिक गतीने कामे करताना गुणवत्ता ढासळू नये, यासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केले जाणार आहे, असे गगराणी यांनी सांगितले. तर, रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्तेचे कामकाज होऊ नये याची दक्षता घेण्यासह आकस्मिक भेटी ,कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देणे, निरीक्षणे नोंदविणे, त्याबाबत अभियांत्रिकी विभागास प्रतिसाद देणे आदी विविध कामे संस्था करेल, अशी माहिती अभिजीत बांगर यांनी दिली.या कराराप्रसंगी, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. के. व्ही. कृष्ण राव, अधिष्ठाता पी. वेदगिरी, प्रा. सोलोमन देबबर्मा यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा >>>वर्सोवा खाडी – मढ यांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या खर्चात ९५ टक्क्यांनी वाढ; विरोधी पक्ष नेता रवी राजा यांचा आरोप
कराराअंतर्गत कोणकोणती कामे करणार?
रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्याकामी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्पस्थळास भेटी देणे इत्यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाच्या व्याप्तीत करण्यात आला आहे.