लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळा मुख्याध्यापकांविनाच चालवल्या जात आहेत. मात्र मुलुंड येथील गव्हाणपाडा माध्यमिक मराठी शाळेत शिक्षण विभागाने दोन मुख्याध्यापकांची नियुक्ती केली. या दोन्ही मुख्याध्यापकांपैकी कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची याबाबतही शिक्षण विभागाने कोणतेही स्पष्ट आदेश दिलेले नाहीत. प्रशासनाच्या या कारभारामुळे शिक्षकांची मात्र कोंडी झाली आहे.
महानगरपालिका गव्हाणपाडा मराठी शाळेची पटसंख्या २५० हून अधिक आहे. या शाळेतील मुख्याध्यापक पद २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून रिक्त होते. मुख्याध्यापक नसल्याने शाळेचा कार्यभार वरिष्ठ शिक्षकांच्या हाती सोपविण्यात आला होता. संबंधित शिक्षक हे विद्यार्थ्यांचे वर्ग घेत शाळेचा गाडा चालवत होते. मात्र एप्रिल २०२३ मध्ये एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील भांडूपमधील एका शाळेतून कविता म्हसकुले यांची मुख्याध्यापकपदी तात्पुरती स्वरुपात बदली करण्यात आली. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये संगीता चव्हाण यांची गव्हाणपाडा मनपा शाळेत मुख्याध्यापकपदी पदोन्नतीने नेमणूक करण्यात आली. मात्र कविता म्हसकुले यांच्या अन्यत्र नियुक्तीबाबत कोणतीही सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून गव्हाणपाडा मराठी शाळेत दोन मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे नेमके कोणाचे आदेश पाळायचे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, एका शाळेत दोन मुख्याध्यापक असू शकत नाहीत, परंतु असा प्रकार घडला असेल तर त्यासंदर्भात माहिती घेण्यात येईल, असे पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी सांगितले.
‘वेतन वसूल करा’
महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकपद रिक्त आहे. परिणामी या शाळांचे कामकाज मुख्याध्यापकांविना चालवले जात असताना मुलुंडमधील गव्हाणपाडा शाळेला दोन मुख्याध्यापक देण्याची कामगिरी शिक्षण विभागाने केली आहे. प्रशासनाच्या या अजब प्रकाराची दखल ऑडिट विभागाने घ्यावी आणि एका मुख्याध्यापकाचे वेतन संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून वसूल करावे, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.