मुंबई : राज्य सरकारच्या सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल झालेल्या २३ अधिकाऱ्यांना नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अमरावती विभागाचे उपायुक्त संजय पवार यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे संचालक नंदू बेडसे यांची छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक विकास अयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिवपदी करण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले निलेश सागर हे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, तर लक्ष्मण भिका राऊत हे बालहक्क सुरक्षा आयोगाचे सचिव झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट शहराच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माधुरी सरदेशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ज्योत्स्ना पडियार यांची अर्थ व सांख्यिकी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी गोपीचंद कदम, हाफकीन महामंडळाच्या व्यस्थापकीय संचालकपदी महेश आव्हाड, तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी वैदेही रानडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बापू पवार यांची पाणीपुरवठा विभागात सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक गायकवाड यांची नियाेजन विभागात सहसचिवपदी, वर्षा लढ्ढा यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, मंगेश जोशी यांची यशदामध्ये उपमहासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.