पु, ल. देशपांडे यांच्या वाचकप्रिय साहित्याचे सादरीकरण सातत्याने होते. पण त्यापलीकडेही त्यांचे बरेच विनोदी तसेच गंभीर स्वरूपाचे चिंतनात्मक साहित्यही आहे, जे सादरीकरणाच्या माध्यमातून फारसे रसिकांपुढे आलेले नाही. या साहित्याचा मागोवा घेणारा ‘अपरिचित पुलं’ हा अभिनव कार्यक्रम शनिवार १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत सादर होणार आहे.

‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘अप्रकाशित पु. ल.’ या संग्राहय़ विशेषांकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्त त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ कलावंत चंद्रकांत काळे यांनी स्थापन केलेल्या ‘शब्दवेध’ या संस्थेमार्फत ‘अपरिचित पुलं’ हा कार्यक्रम सादर होणार असून, संस्थेच्या त्रिदशकपूर्तीच्या वर्षांत पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त असा अभिनव कार्यक्रम सादर करता येणे, हा एक सुंदर योगायोग आहे, असे काळे यांनी सांगितले.

मराठी साहित्यविश्वात पु. ल. देशपांडे हे ख्यातकीर्त विनोदी लेखक म्हणूनच प्रसिद्ध आहेत. अष्टपैलू कलावंत म्हणून ते जसे ओळखले जातात तसेच हे अष्टपैलुत्व त्यांच्या लेखनातूनही आपल्याला आढळून येते. विनोदी लेखनाबरोबरच त्यांनी चिंतनात्मक, गंभीर स्वरूपाचे, तरल काव्यात्मक, रसरशीत प्रवासवर्णनात्मक लेखन केलेले आहे. त्या अनुषंगाने चंद्रकांत काळे म्हणाले, की ‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमात विनोदाबरोबरच अशाच काही लेखनाचं दर्शन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच पुलंच्या काही कविताही या वेळी गीत स्वरूपात गायल्या जाणार आहेत.

खोगीर भरती, अघळपघळ, हसवणूक, गाठोडं, उरलंसुरलं, मी एक शून्य यांसारख्या ललितसंग्रहातील लेखनावर आधारित हा कार्यक्रम आहे. अर्थातच पुलंचं जे साहित्य खूप लोकप्रिय, गाजलेलं आहे, ज्यावर आधीच काही सादरीकरण झालेलं आहे (व्यक्ती आणि वल्ली, बटाटय़ाची चाळ, गणगोत, असा मी असा मी, नाटके, चित्रपट इ.) ते या कार्यक्रमात टाळले आहे, असे काळे यांनी सांगितले.

‘शब्दवेध’ला यंदा ३० र्वष पूर्ण झाली आहेत. अमृतगाथा, प्रीतरंग, आख्यान तुकोबाराय, साजणवेळा, शेवंतीचं बन यांसारखे आठ कार्यक्रम या संस्थेने गेल्या तीन दशकांत सादर केले. संस्थेची त्रिदशकपूर्ती आणि पुलंची जन्मशताब्दी हा एक छान योग असून, या नवव्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुलंना केलेली ही मानवंदनाच आहे, असेही ते म्हणाले.

प्रकाशनाचा हा कार्यक्रम शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता, माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे होणार आहे. पुलंचे अपरिचित पैलू उलगडणाऱ्या या कार्यक्रमात चंद्रकांत काळे यांच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर हेही सहभागी होणार आहेत.

व्हीटीपी रिअ‍ॅलिटी आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आणि पीतांबरी हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक असून, पॉवर्ड बाय मँगो हॉलिडेज व पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स आहे. या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश असून प्रवेशिका तीस मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी मिळणार आहेत.

Story img Loader