अरबाज खानच्या बेटिंग प्रकरणाशी भारतीय क्रिकेट नियामंक मंडळ (बीसीसीआय) किंवा इंडियन प्रिमियर लीगचा काहीही संबंध नाही असे आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी शनिवारी स्पष्ट केले. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात शनिवारी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अरबाज खानची चौकशी केली.

हे प्रकरण पोलिसांकडे आहे. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. बीसीसीआय आणि आयसीसीची भ्रष्टाचार विरोधी पथके आहेत. पोलीस त्यांच्याशी समन्वय साधून सल्लामसलत करु शकतात असे शुक्ला यांनी सांगितले.

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळण्यामध्ये कुठला बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी असेल तर त्याच्यावर गॅमबलिंग कायद्याखाली खटला चालेल. ज्यासाठी जास्तीत जास्त दंड होऊ शकतो. पण बुकी किंवा सेलिब्रिटीने खेळाडूच्या मदतीने फिक्सिंग केले तर तो गंभीर गुन्हा ठरतो असे बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे माजी प्रमुख नीरज कुमार यांनी सांगितले.

आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याची कबुली बॉलिवूड अभिनेता-निर्माता अरबाज खानने दिली आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याचे अरबाजने तपास अधिकाऱ्यांसमोर कबूल केले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी शुक्रवारी सकाळी अरबाज खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी समन्स पाठवण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी शनिवारी सकाळी अरबाजला चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला बुकी सोनू जालान आणि अरबाजला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. अरबाज आणि सोनू जालान मागच्या पाच वर्षांपासून परस्परांना ओळखत होते.

Story img Loader