आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीमध्ये सहभागी असल्याची कबुली बॉलिवूड अभिनेता-निर्माता अरबाज खानने दिली आहे. आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याचे अरबाजने तपास अधिकाऱ्यांसमोर कबूल केले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी शुक्रवारी सकाळी अरबाज खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी समन्स पाठवण्यात आले होते. ठाणे पोलिसांनी शनिवारी सकाळी अरबाजला चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेला बुकी सोनू जालान आणि अरबाजला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. अरबाज आणि सोनू जालान मागच्या पाच वर्षांपासून परस्परांना ओळखत होते.

दोन दिवसापूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालानला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरबाज खानचे नाव समोर आले. सोनू जालान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा माणूस असल्याचे म्हटले जाते. सट्टेबाजीमध्ये अरबाजला २.८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे टाइम्स नाऊने म्हटले आहे. अरबाज सोनू जालानला ३ कोटी रुपये देणे होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होता. पैसे दिले नाहीस तर नाव उघड करण्याची धमकी सोनूने अरबाजला दिली होती असे टाइम्स नाऊने आपल्या वृत्तात म्हटले आहे. १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजी रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतातील सट्टा बाजारातील मोठे नाव असलेला कुप्रसिद्ध सट्टेबाज सोनू जालान याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने २९ मे रोजी अटक केली आहे. अल जझीरा या परदेशी वृत्तवाहिनीने कथित स्टिंग ऑपरेशनद्वारे भारताने क्रिकेट कसोटी सामने फिक्स केल्याचा दावा केला होता. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर सोनू जालानची अटक ही पहिली कारवाई असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. यात अनेक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.